साकोली : महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत देण्यात येणाऱ्या विशेष घटक योजनेंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या सोलर कंदील वाटपात अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांना वगळून इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, अशी तक्रार जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्या व साकोलीच्या जिल्हा परिषद सदस्या गीता कापगते यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे केली आहे.या तक्रारीनुसार जिल्हा परिषद भंडारा महिला व बालकल्याण विभागातर्फे सन २०१०-११ व २०१२-१३ या वर्षात विशेष घटक योजना शासननिधी अंतर्गत लाभार्थ्याची निवड करण्यात आली होती. अनुसूचित जाती घटकातील नावे करून ओबीसी व इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना नियमबाह्यरीतीने लाभ देण्यात आला आहे. सन २०११-१२ यादी क्रमांक २२० संगीता गुरूप्रसाद राऊत साकोली यांच्याऐवजी छाया छगन पात्रीकर रा. उमरी यांना लाभ देण्यात आला. सन २०१२-१३ मधील यादी क्रमांक ८३ नुसार नलू शेखर गोंडाणे रा. गडकुंभली यांचेऐवजी शारदा पद्माकर लांजेवार रा. सेंदुरवाफा यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती आहे. सन २०११-१२ नुसार जयश्री अनिरूद्ध राऊत रा. बाम्पेवाडा यादी क्रमांक १७१, १००, १५६ यांचेऐवजी सुभद्रा काशीनाथ कापगते रा. वांगी यांना लाभ देण्यात आला. सन २०१२-१३ मधील यादी क्रमांक ४४, ५३ नुसार यमु आनंद रंगारी रा. साकोली यांचेऐवजी निर्मला रामदास शिवणकर रा. पळसगाव यांना लाभ देण्यात यावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गीता कापगते यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सौर ऊर्जेच्या कंदील वाटपात घोळ
By admin | Updated: July 12, 2014 23:32 IST