पुराम यांचे आवाहन : आदिवासी दिनानिमित्त प्रकल्प कार्यालयातर्फे गुणगौरव सोहळा देवरी : भारतीय स्वातंत्र्यामध्ये आदिवासी क्रांतीकारकांची भूमिका महत्वाची होती. विद्यार्थ्यांनी चांंगले शिक्षण घेवून आपल्या आई-वडीलांचा नावलौकिक वाढवावा. आदिवासी समाजाची व देशाची सेवा करावी, असे आवाहन आ.संजय पुराम यांनी विद्यार्थ्यांना केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरीतर्फे शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तथा एकलव्य निवासी शाळा (पब्लिक स्कूल), बोरगाव/बा. येथे ९ आॅगस्टला भगवान बिरसा मुंडा सभागृहामध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सुरूवातीला गावात प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी संपुर्ण शालेय परिसर स्वच्छ व रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रामरतन राऊत, प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष भरत दुधनाग, सभापती पं.स.देवरी देवकी मरई, पोलीस उपनिरीक्षक पाटील, आदिवासी सेवक प्रल्हाद भोयर, कार्यकारी अभियंता पं.स.देवरी खोब्रागडे, सरपंच पुनाराम तुलावी, भंडारी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. प्रकल्पातील सर्व शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेमधील वर्ग १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय विशेष नैपुण्य प्राप्त खेळाडु, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, आदिवासी सेवक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात युनेस्को क्लब, क्लबचे सदस्य, क्लबचे सल्लागार संजय पुराम, युनेस्को क्लब संचालक तथा प्राचार्य जगदिश बारसागडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यानी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य व भाषणे सादर केली. आदिवासी जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी ज्या विविध विभागाद्वारे विविध योजना राबविल्या जातात या विषयी विविध विभागाद्वारे स्टॉल सुध्दा लावण्यात आले होते. रमन विज्ञान केंद्र नागपूर द्वारे आयोजित भ्रमनशिल विज्ञान प्रदर्शनी, ग्रंथालय प्रदर्शनी, संस्काराचे मोती उपक्रम व शब्दकोष अभियान उपक्रमास आ. संजय पुराम सह इतर मान्यवरांनी भेट दिली. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी विजय टेंभूर्णीकर, पी.एन.रघुते, जिभकाटे, पी.पी.कोरोंडे, के.बी.राऊत व अधिकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते. संचालन विलास बारसागडे यांनी व आभार पी.बी.श्रीखंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
चांगले शिक्षण घेऊन समाजाची सेवा करा
By admin | Updated: August 12, 2016 00:35 IST