कोविडमुक्त गावातील शाळा सुरू करण्याचे परिपत्रक ७ जुलैला शासनाने पारित केले. त्यानुसार शाळा सुरू करताना गाव कोविडमुक्त असावा. त्यानंतर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करायची होती. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत सगळं काही सामसूम होते. लोकमतमध्ये १२ जुलै रोजी ‘‘चला मुलांनो शाळेत चला’’चा मार्ग मोकळा ही बातमी प्रसिद्ध झाली. सगळे खाडकन जागे झाले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना शाळा सुरू करण्यासाठी समिती गठित केल्याचा अहवाल मागितला. तत्पूर्वी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांनी ७ जुलै रोजीच शासन निर्णय व शिक्षण विभागाकडे पृष्ठांकन क्रमांक १७४८ दिनांक ७ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांना माहितीसाठी प्रत दिली. तसेच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र पाच दिवस सगळे गप्प होते. गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत काही सूचना मिळाल्या नाहीत, तर समित्या स्थापन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत गटविकास अधिकाऱ्यांना मिळायला पाहिजे होत्या; पण तसे दिसून आले नाही. मात्र, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे पत्र सर्व गटशिक्षणाधिकारी यांना १२ जुलै रोजी प्राप्त होताच शिक्षण विभाग कामाला लागले. दोन दिवसांपासून कुठे समित्या झाल्या, याची खबर घेत आहेत.
तसेच गटविकास अधिकारी मोहाडी यांनी आपल्या स्तरावर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना शाळा सुरू करण्याचा परिपत्रक व्हाॅट्सॲपवर घातला. घाईगडबडीत अनेक ग्रामपंचायतींनी सभा घेऊन समित्या स्थापन केल्या. पण, अजून ठराव पंचायत समितीकडे अनेक ग्रामपंचायतींनी पाठविले नाही. शाळा सुरू करण्याचा पुढाकार स्थानिक स्वराज्य संस्था यांचा असताना शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. यात समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.
बॉक्स
मोहाडी तालुक्यात ४४ शाळा आहेत. त्यापैकी ४ शाळा नगर पंचायतच्या हद्दीत येतात. आता उर्वरित ४० शाळा असलेल्या गावात ३२ ग्रामपंचायतींनी समित्या गठित केल्या आहेत. त्यातील उद्या २८ शाळांत मुलांची किलबिलाट ऐकायला येणार आहे.
बॉक्स
शाळा सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा, असे परिपत्रक म्हणतो. मात्र, खरिपाच्या हंगामात पालक व्यस्त असताना समितीने गावातील पालकांसोबत ठराव घेताना चर्चा केली असेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.