मोहाडी : सामाजिक कृतज्ञता फेडण्याची मानसिकता असेल तर दातृत्वाचे अनेक हात सढळपणे मदतीला पुढे जातात. असे अनेक दातृत्वाचे हात पुढे आल्याने मोहाडी तालुक्यातील पाचवी व आठवीचे सर्वच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत. अशा या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद प्रथमच मोहाडी तालुक्यात होणार आहे.
बालवयात स्पर्धा परीक्षेची बीज शिष्यवृत्ती परीक्षेपासून रोवली जातात. मात्र अनेक पालक आर्थिक बाब पुढे करून तसेच शिक्षण घेऊन काय होतं ही मानसिकता करून बसल्याने बरेच विद्यार्थी पहिल्याच स्पर्धेच्या पायरीवर अडकून पडतात. स्पर्धा परीक्षेची समरूप शिष्यवृत्ती परीक्षा असते. कोवळ्या वयात स्पर्धा परीक्षेचे संस्कार व्हावेत म्हणून शिष्यवृत्ती-मिशन हंड्रेड हा उपक्रम मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी हाती घेतला.
पाचवी व आठवीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवायचे ही योजना आखली. पालकांकडून एकही रुपया न घेता ही योजना तडीस नेण्याची किमया लीलया गटशिक्षणाधिकारी यांनी पार पाडली. आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे हा उपक्रम तडीस नेण्यासाठी साकडे घातले. आमदार कारेमोरे यांनी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी आर्थिक निधीची तरतूद करून दिली. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील आठवी व पाचवी वर्गातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षेला बसविण्याच्या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद पहिल्यांदाच मोहाडी तालुक्यात किंबहुना भंडारा जिल्ह्यात केली जाणार आहे.
परीक्षेला विद्यार्थी बसविणे व अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र व्हावी ही धडपड चालली होती. त्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी सगळ्याच शाळांत अधिकचे वर्ग घेण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांचे दोन सराव पेपरही घेण्यात आले होते. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी पात्र व्हावेत यासाठी शिक्षण विभागाची एक टीम व शिक्षक मेहनत घेत होते. मात्र कोविड-१९च्या प्रभावाने शाळा बंद पडल्या. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या होत्या. आता पाचवीची मुले सहावीत, तर आठवीची मुले नववीत आली आहेत. अखेर शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यामुळे पुन्हा त्या मिशनची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी २८, २९ जुलै तसेच ३ व ४ आगस्ट रोजी आठवी, पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी सराव पेपर घेतले जाणार आहेत.
बॉक्स
तीन लाख रुपयांचा निधी
शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी स्थानिक निधीतून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र सार्वजनिक उपक्रम नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. विकास निधी परीक्षा शुल्क भरण्यासाठी देता येणार नाही, अशी तांत्रिक अडचण जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. पण, आमदार राजू कारेमोरे यांनी देव्हाडी येथील क्लेरेरीयन ड्रग प्रा. लि. कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून तीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले आहेत.
मार्गदर्शिका पुस्तकांचे वितरण
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तकांची मोठी अडचण होती. परंतु, भारतीय जीवन विमा निगमचे विकास अधिकारी नरेश दीपटे व त्यांच्या अभिकर्त्यांनी दातृत्वाच्या हात पुढे केला. तीन लाख रुपयांच्या मार्गदर्शक पुस्तकांचे वितरण सर्व शाळेत जाऊन करण्यात आले. त्यामुळे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अभ्यासाची तयारी करणे सुलभ झाले.
दहा केंद्रांवर परीक्षा होणार
प्रथमच सगळेच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्यात आल्याने मोहाडी तालुक्यात दहा केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्या दहा केंद्रांवर पाचवीचे १,८५४ विद्यार्थी, तर १९१४ आठवीचे एवढे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
कोट
शिक्षण हा विकासाचा पाया आहे. बालवयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दिशा मिळावी यासाठी आपला प्रयत्न आहे. गाव व देशाचा खरा विकास शिक्षणामुळेच घडू शकतो. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उपक्रमाशिवाय शिक्षणावर निधी अधिक खर्च करावा.
राजू कारेमोरे, आमदार
230721\logomsce.jpg
दातृत्वाच्या पाठबळाने सर्वच विद्यार्थी देणार परीक्षा
ऐतिहासिक उपक्रम :शिक्षण विभागाचा पुढाकार
राजू बांते