करडी (पालोरा): सध्या शहरी भागासोबतच मोहाडी
तालुक्यातील करडी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या
दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यांच्यावर वेळीच उपचार होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी करडी परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्य विषयावर होणारा खर्च एकत्रित करून प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी ढिवरवाडाचे सरपंच धामदेव वनवे यांनी केली आहे.
वनवे म्हणाले, संपूर्ण देशात कोरोना संसर्गाची महामारी सुरू आहे. करडी परिसरातील बहुतेक सर्व गावांत अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. गावागावात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत परिसरात झालेले सर्वाधिक मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच शहरातील दवाखान्यात बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सुविधा न मिळाल्याने झाले आहेत, हे सत्य नाकारता येणारे नाही. त्यामुळे
सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील दवाखान्यात गर्दीमुळे निर्माण होणारी गैरसोय टाळून वेळेत उपचार व्हावे, यासाठी आरोग्य वर्धिनी केंद्र करडी व परिसरातील सर्व उपकेंद्रात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील सरपंचांनी केली होती; परंतु त्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
करडी परिसरात २५ गावे येतात. प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळतो. त्यातून काही निधी आरोग्यावर खर्च करता येतो. सर्व ग्रामपंचायत सरपंचांनी तसा ठराव घेऊन निधी एकत्रित केला तर परिसरात कोविड सेंटर सुरू करता येईल व रुग्णांचा जीव वाचविता येईल, असेही धामदेव वनवे म्हणाले.
तर व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या सुविधेने वाचतील प्राण
करडी परिसर हा जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणापासून वैनगंगा नदीमुळे वेगळा पडला आहे. पूर्व व दक्षिणेला न्यू नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प व कोका वन्यजीव अभयारण्याचे घनदाट जंगल आहे. तुमसर शहर २५ कि.मी., भंडारा ३0, तर साकोली ३५ आणि तिरोडा शहर २७ कि.मी. अंतरावर आहेत. परिसरात आरोग्याच्या सुविधांसाठी करडी येथे एकमेव आरोग्य केंद्र आहे.
करडी येथे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सुविधा नाही. करडी येथे २० ते २५ बेडची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
तिसऱ्या संक्रमणापूर्वी सावध व्हा
सध्या कोरोना महामारी दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्याचे सामाजिक संक्रमण वाढण्यापूर्वी आताच सावध होऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भंडारा किंवा तुमसर येथे गर्दीमुळे वेळेवर उपचार होत नाही व रुग्णांचे जीव जात आहेत. परिणामी वेळेपूर्वीच सावधान होण्याचे आवाहन धामदेव वनवे यांनी करडी परिसरातील सरपंचांना केले आहे.