भंडारा शहरातील व्यापारपेठ आधीच लहान आहे. अवघ्या दोन किलोमीटरच्या परिघात येथील बाजार आहे. मात्र या सर्वच बाजार ओळींमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले गेले आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होऊन बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होते. बाजार ओळीत कुठेही फिरले तरी दुकानाचेच अतिक्रमण रस्त्यावर आल्याचे चित्र पहायला मिळते. अगदी पहाटे अथवा रात्री दुकान बंद झाल्यानंतर बाजारओळ मोकळी दिसते. मात्र प्रत्यक्ष दुकाने सुरू असताना अर्धा अधिक बाजार रस्त्यावरच मांडलेला असल्याचे दिसून येते. दुकानातील ग्राहकांना दिसण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात माल रस्त्यावर काढला जातो. दुकानाचे बोर्ड रस्त्यावर आलेले आहे. दुकानासमोरील वाहने ठेवण्याच्या जागेवरही सिमेंट क्राँकीट टाकून ती जागा ताब्यात घेतली गेली आहे. कापड दुकानांमध्ये तेथे पुतळे लावले जातात. अनेक दुकानांचे काऊंटर या पार्किंगच्या जागेत थाटले गेले आहे. मुख्य रस्त्यापर्यंत शक्यतेवढी जागा सिमेंट पायऱ्यांनी व्यापली आहे. त्यापुढे ग्राहकांना वाहनांचे पार्किंग करावे लागते. बाजारपेठेत दुचाकी वाहनांच्याच पार्किंगची नीट व्यवस्था नाही. तेथे चारचाकी वाहनांची पार्किंग करताना किती नाकीनऊ येत असतील याची कल्पना येते. पार्किंगच्या या कारणावरुन अनेकदा भांडणे उदभवतात, मारापिटीपर्यंत प्रकार घडतात. ग्राहकांच्या बळावर लाखो रुपये कमावणारा दुकानदार मात्र एक तर बघ्याची भूमिका घेतो किंवा थेट हात वर करतो. दुकानदारांच्या अतिक्रमण व पार्किंगची सोय नसल्याने खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना मात्र प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. व्यापारी-व्यावसायिक मंडळी अतिक्रमण काढण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेचे ‘तोंड भरुन’ आतापर्यंत संरक्षण मिळवित होते. ‘नॉनकरप्ट’ प्रतिमा असलेले कलेक्टर, एसपींच्या काळात मात्र संरक्षण देणाऱ्यांची तोंडे रिकामी व्हावी आणि नागरिकांच्या सोईसाठी अतिक्रमण हटवून तेथे पार्किंगची व्यवस्था व्हावी ही भंडाराकर जनतेची मागणी आहे. बहुतांश दुकानांचे अतिक्रमण सरकारी रस्त्यावर बऱ्याच दूरपर्यंत आले आहे. या दुकानांमध्ये येणाऱ्या मालाची वाहने दिवस-दिवसभर दुकानापुढे उभी राहतात. त्यामुळे अपघात वाढले आहे. हार्डवेअरच्या दुकानांपुढे तर टीन व अन्य लोखंडी साहित्य ट्रकमधून उतरविताना, ने-आण करताना वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भयावह स्थिती आहे. पोस्ट आॅफिस चौक, मोठा बाजार परिसर ते गांधी चौक या मार्गापासून ते शास्त्री चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, त्रिमुर्ती चौक व राजीव गांधी चौकातही अशीच समस्या कायम आहे. शहरात वाढलेल्या या अतिक्रमणासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी, प्रशासन, अभियंते, वाहतूक पोलीस व दंडाधिकारीय यंत्रणा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका नागरिकांमधून ठेवला जात आहे. त्यातही महत्वाची भूमिका ही नगर परिषद व नगररचना, नझूल विभागाने वठविल्याचे दिसून येते. काही दिवसापूर्वी पालिका प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. त्यांनतर पालिकेने दुकानदारांसाठी मार्किंग करून दिली. आठवडाभर या अतिक्रमण हटाव मोहिमेची धास्ती व्यापाऱ्यांमध्ये राहली. मात्र, त्यांनतर आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे. व्यापाऱ्यांनी त्यांचे अतिक्रमण पुन्हा रस्त्यावर केले असून वाहनधारकांना वाहन चालविणे अडचणीचे होतानाचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी शहरातील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अतिक्रमण काढताना त्यांनी गरिबांचे अतिक्रमण काढावे, मात्र मोहिमेची सुरुवात श्रीमंतांची दुकाने असलेल्या मुख्य बाजारपेठेतून करावी, असा नागरिकांचा एकमुखी सूर आहे. आतापर्यंत अतिक्रमण मोहीम पूर्णवेळ राबविल्याची नोंद नाही. केव्हा तरी दरवर्षी मोहीम सुरू होते आणि काही दिवस चालवून अर्ध्यातून मधातच केव्हा तरी बंद होते असाच बहुतांश अनुभव आहे. त्यात नेहमीप्रमाणे टपऱ्या-पानठेले हटविले जातात. काही दिवसांनी ते पुन्हा येऊन बसतात. वारंवार हटविल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण होत असेल तर थेट फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आहे.जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांच्याकडून भंडाराला वाहतुकीची शिस्त लावली जाईल, अशी रास्त अपेक्षा शहरातील जनतेला आहे. ही शिस्त लावण्यासाठी आधी व्यापारपेठेतील अतिक्रमण हटविणे व वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. हे काम या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच होऊ शकेल, असा विश्वास जनतेला आहे. भंडारा हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर आहे. याच मार्गावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासोबतच न्यायालय, जिल्हा परिषद असे महत्वाच्या कार्यालयाखेरीज अन्य कार्यालयही आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चौक म्हणून त्रिमूर्ती चौकाला ओळखले जाते. याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने चौकात अनेकदार छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असल्याने सर्वसामान्य दाद तरी कोणाला मागणार? या चौकात वाहतूक शिपायांची नेमणूक असते, परंतु नियमाला जागणारा वाहनचालक येथे मिळत नाही, हेच दुर्भाग्य आहे.
साहेब बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा हो...!
By admin | Updated: July 29, 2015 00:35 IST