मोहाडी : अलीकडे बालकांसह युवकांमध्येही क्रिकेटशिवाय इतर मैदानी खेळांचे आकर्षण कमी होत आहे. संगणकीय गेम किंवा मोबाईलवर खेळण्यातच युवा वर्गाचा वेळ जात आहे. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आता ग्रामीण भागातही येऊ लागली आहे. आधी सुट्या लागल्या आणि उन्हाळा सुरू झाला की बालकांची पावलं मैदानी खेळांकडे वळायची. त्यात कबड्डी, गिल्ली-दांडू, आट्यापाट्या या खेळांना विशेष महत्त्व असायचे. पण बदलत्या युगाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. पूर्वी या भागात खेळल्या जाणाऱ्या खेळावरही व्हिडिओ गेम आणि टीव्हीने ताबा मिळवला आहे. त्यामुळे मैदानी खेळ आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मैदानी खेळ म्हणून आता केवळ क्रिकेट तेवढा शिल्लक दिसत आहे. वास्तविक बालकांच्या शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ गरजेचे असतात. १५ ते २० वर्षापूर्वी लगोरी खेळाची क्रेझ होती. खापरड त्याकामी उपयोगात येणाऱ्या कवळया, गोट्यांची जागा आता बुध्दीबळातील गोट्यांच्या सापशिडींनी व ल्युडो नावाच्या विदेशी खेळाने घेतली आहे. सडी किंवा आबाधुबी आता कुणी खेळत नाही. असे झाडही आता उपलब्ध नाहीत. कुची खेळताना मार, जखमांचा विचार तेव्हा बालके करीत नव्हती. त्रिकोण ९ गोटे, २१ गोटे तर दिसतच नाही. आळा फोडणीचा काठ्यांचा खेळ कित्येक वर्षापूर्वीच बंद झाला. तळ्यात, नदी की पाळ, माचिसच्या काडीपेडीचे पत्ते आता कुणी गोळा करीत नाही. गोलातून बॉटल्सचे झाकण कवेलूने काढले जात नाहीत. बंद भरणी, डबल का सिगल आता कुणाला आठवतही नसेल. चिंचोटे, सीताफळाच्या बिया लपविणे, बाहुले गाडगे, मांडव तयार करणे, भातुकली, सासू सासऱ्याचा खेळ आत कालबाह्य झालेत. कंच्याचे खेळ टोच पाच, राजा-राणी, बेंडावा गोळी, टिब्बू, लंगडी थोड्याफार प्रमाणात मुली खेळतात. इंकी पिंगी व्हाट कलर? रेस टिप, विष अमृता खेळही आता खेळला जात नाही. टायरचे चक्के आता रस्त्यांनी फिरविले जात नाहीत. भोवरे कधी-कधी खेळले जातात. गिल्ली दांडूसुध्दा खेळण्याचे प्रमाण कमी आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण भागातही मैदानी खेळांचा पडतोय विसर
By admin | Updated: June 15, 2016 00:47 IST