२४ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा : १५ वर्षांपासून असलेल्या निर्बंधातून शेतकरी मुक्तभंडारा : साकोली तालुक्याच्या निम्न चुलबंध प्रकल्पबाधित क्षेत्रातील २४ गावांतील १३९.९४ हेक्टर व लाभ क्षेत्रातील ५ हजार ८९३.९८ हेक्टर जमिनीला हस्तांतरण, विभागणी, सुधारणा, रूपांतरण आणि विक्री आदी व्यवहारावर २९ डिसेंबर २००० पासून निर्बंध लागू केले होते. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी गुरूवारी महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियमानुसार अधिसूचना जारी करून मागील १५ वर्षांपासून जमिनीवर असलेले निर्बंध हटविले आहेत. यामुळे साकोली तालुक्यातील २४ गावातील जमीनधारक व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निम्न चुलबंध प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियमांतर्गत २९ डिसेंबर २००० रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार निम्न चुलबंध प्रकल्पाचे प्रभाव क्षेत्रात साकोली तालुक्यातील बाधित लवारी, गडकुंभली, वडद, कुंभली आणि लाभ क्षेत्रात असलेली बोदरा, पिंडकेपार, साकोली, खैरलांजी, जमनापूर, पाथरी, सेंदूरवाफा, गडकुंभली, कुंभली, धमार्पूरी, सावरबंध, बोंडे, खंडाळा, साखरा, कटंगधरा, सासरा, वटेटेकर, सुकळी, न्याहारवाणी, शिवणीबांध, विहिरगांव (बु.), वडद, महालगाव या गावांच्या अधिसूचित असलेल्या बाधित क्षेत्रातील १३९.९४ हेक्टर व लाभ क्षेत्राच्या ५ हजार ८९३.९८ हेक्टर जमिनीला हस्तांतरण, विभागणी, सुधारणा, रूपांतरण आदी व्यवहारावर निर्बंध लागु झाले होते.या निर्बंधामुळे साकोली तालुक्यातील गावाचे लाभ क्षेत्रातील ६ एकरावरील जमीनधारकांना शेतजमीन विक्री, वाटणी व हस्तांतरण आदी प्रकारच्या व्यवहारासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. पुनर्वसन अधिनियमाचे तरतुदीनुसार, ज्या जमीनधारकांची शेतजमीन राखीव ठेवण्यात आली होती. त्यांना त्यांचे सातबारा प्रमाणपत्रावरील नोंदीमुळे अशा जमीनीची विक्री करता येत नव्हती. यामुळे विवाह, शिक्षण व आजारपण अशा कारणांसाठी जमीन विक्री, वाटणी आदीची गरज असलेल्या जमीनधारकांना विविध अडचणीला तोंड द्यावे लागत होते. निम्न चुलबंध प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे प्रकल्पाचे प्रभाव क्षेत्रात असलेल्या जमीनीवरील निर्बंध कमी करण्याबाबत अनेक जमीनधाकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्बंध हटविण्याची मागणी केली होती. लोकांना होत असलेल्या अडचणी विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाना सदर निर्बंध कमी करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. सदर अधिसूचना जारी झाल्याबाबत सर्व ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय साकोली व संबंधित विभागांना सूचित केले आहे. या निर्णयामुळे साकोली तालुक्यातील २४ गावातील जमीनधारकांना यापुढे जमीन हस्तांतरण, विभागणी, रूपांतरण, सुधारणा व विक्री आदी संबंधाने परवानगी घेण्याची आवश्यकता पडणार नाही.साकोली तालुक्यातील २६ गावातील जमीनधारक व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. यापूर्वी प्रकल्पाचे प्रयोजनाकरीता राखीव ठेवण्यात आलेल्या जमीनीच्या सातबारा प्रमाणपत्रामधील नोंदी कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी साकोलीचे तहसिलदार व संबंधित गावांमधील तलाठ्यांना निर्देश दिले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
‘निम्न चुलबंध’च्या प्रभाव क्षेत्रातील निर्बंध हटविले
By admin | Updated: March 18, 2016 00:31 IST