पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यात प्रशासकीय गौण खनिजाची चोरीचे प्रमाण वाढले आहे. यात रेती, मुरुम, गिट्टी आदी गौण खनिजाची रात्रंदिवस चोरी होत आहे. यात प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. गौण खनिजांच्या चोरीचे प्रमाण थांबविण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत पोलिस प्रशासनाने सुद्धा पुढाकार घेतला आहे.यात पोलीस विभागाची मध्यम कर्मचाऱ्यापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची जोरदार कमाईचे साधन बनले आहे. पोलीस प्रशासनापासून तर महसूल विभागाचे लक्ष रेती माफियांकडे लागले आहे. रेती माफीयांकडून चोरीचे दंड वसूल केले जाते. मात्र पावती दिली जात नाही. पोलीस प्रशासनाकडून दंड वसूल केला जातो. पवनी पोलीस स्टेशनचे नव्याने आलेले ठाणेदार नेवारे यांनी तर रेतीमाफियांना सळो की पळो करुन सोडले आहे. रेती चोरी करणाऱ्यांवर दंड बऱ्याच प्रमाणात वसूल केल्या गेले आहे. मात्र प्रशासकीय दंडाच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. तालुक्यात सर्वच रेती घाट बंद करण्यात आले. अनेक बेरोजगार झाले. तर अनेकांचे रेतीमुळे बांधकाम अडकून पडले आहेत. गौण खनिजाची चोरी थांबविण्यासाठी महसूल विभागाने पोलीस प्रशासनाची मदत घ्यायला पाहिजे. मात्र तसे होत नाही. रेतीची चोरी पोलीस प्रशासनाची व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कमाईचे साधन बनले आहे. परिसरात विनापरवानगीने विटाभट्या सुरु आहेत. जंगलाची चोरी करून विटा पळविणे सुरु आहे. मुरुमाचे अवैध उत्खनन करून विक्री सुरु आहे. याकडे मात्र कुणाचेही लक्ष लागत नाही. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांचे चांगलेच खिसे गरम होत आहेत. पैसे घेण्यासाठी रात्रंदिवस मोटारसायकलने फिरत दिसतात. दोन दिवसापूर्वी ठाणेदारांनी कुर्झा रेती घाटावरून तीन ट्रॅक्टर मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या ठाणेदारांना पवनी शहरात मोहफुलाची व अवैध दारु विक्रेते दिसत नाही. क्षमतेपेक्षा जास्त रेती नेणारे ट्रक दिसत नाही. एकट्या पवनी शहरात जवळपास २० अवैध दारु विक्री करणारे व सट्याचा व्यवसाय करणारे आहेत. पवनी पोलीस ठाण्याअंतर्गत आसगाव, भुयार, मेंढेगाव, कुर्झा, निष्ठी, बेटाळा, निलज, वाही अशा अनेक गावात अवैध दारु विक्रेते आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत नाही हे एक कोडेच म्हणावे लागेल. खैरी येथे पोलीस चौकी लावण्यात आली आहे. येथील कर्मचारी दुचाकी चालकांपासून तर वाहन चालकांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने लुटमार करीत आहेत हे बोलके चित्र पहायला मिळत आहे. (वार्ताहर)
पोलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार
By admin | Updated: June 16, 2014 23:21 IST