तुमसर : तुमसर नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर येत्या ५ आॅगस्टला नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. १ आॅगस्ट रोजी राकाँ कडून अभिषेक कारेमोरे यांनीच केवळ नामांकन दाखल केले. त्यामुळे कारेमोरे यांची बिनविरोध निवड होणार आहे. ५ आॅगस्टला केवळ औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. उपाध्यक्ष पदाकरीता येथे मोठी रस्सीखेच सुरू आहे.७ आॅगस्टला नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणुकीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. ५ आॅगस्टला नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक घेण्यात येत आहे.नगराध्यक्ष पदाकरीता १ आॅगस्टला नामांकन दाखल करण्यात आले. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकून अभिषेक कारेमोरे यांनी नामांकन दाखल केले. अन्य दुसऱ्या नगरसेवकांनी नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे अभिषेक कारेमोरे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड येत्या ५ आॅगस्टला होणार आहे. पक्षीय स्थिती- २३ सदस्यीय तुमसर नगरपरिषदेत राकाँचे १२, भाजप-५, काँग्रेस-३, समाजवादी -२ नगरसेवक आहेत. निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाच्या २ नगरसेवकांनी राकाँमध्ये प्रवेश केला होता. नगरपरिषदेत १४ नगरसेवकांचा गट तयार झाला होता.राकाँ व भाजप नगरसेवक अज्ञातस्थळीनिवडणुकीपूर्वीच राकाँ व भाजपचे १३ नगरसेवक अज्ञातस्थळी येथे रवाना झाले होते. दि. १ व २ आॅगस्ट रोजी ते तुमसरात नामांकनानंतर दाखल झाले. राकाँ-१४, काँग्रेस-३ अशी भक्कम स्थिती सत्ताधाऱ्यांची येथे होती तरी राकाँ व भाजपचे १३ नगरसेवक अज्ञातस्थळी का रवाना झाले होते अशी चर्चा शहरात आहे.१५ दिवसांपूर्वी राकाँचे १४ नगरसेवकांच्या गटातील ३ नगरसेवक व १ नगरसेविका नगराध्यक्ष पदाकरीता इच्छुक होते. यात विद्यमान नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख व विद्यमान न.प. उपाध्यक्षा विजया चोपकर यांचा समावेश होता. राकाँ नगरसेवकांनी दोनदा बैठक झाली. यात विद्यमान नगराध्यक्षांचा विरोध काही नगरसेवकांनी केला होता. गोंदियापर्यंत काही नगरसेवकांनी धाव घेतली होती. अखेर अभिषेक कारेमोरे यांच्या नावावर राकाँ श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. राकाँ-१४, काँग्रेस -३ असे १७ नगरसेवकांची राकाँ-काँग्रेस युतीची सत्ता आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पदी भाजप नगरसेवकांची निवड होणे येथे कठीणच आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्षपदी राकाँचे अभिषेक कारेमोरे यांची बिनविरोध निवड!
By admin | Updated: August 3, 2014 23:11 IST