मृग नक्षत्रात पावसाने आशा दाखविल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने धानाची नर्सरी टाकली. पऱ्हे पावसाने तरारून आले. शेतकऱ्यांनी रोवणीची तयारी सुरू केली. मात्र, पावसाने नेहमीप्रमाणे दगा दिला. गत दोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. कुठे एखाद्यी पावसाची सर कोसळते. मात्र, वातावरणात एवढा उकाडा आहे की, रोवणी केल्यानंतर पऱ्हे जगतील की नाही याची चिंता आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील संपूर्ण रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टरवर रोवणीचे नियोजन आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात केवळ ३९ हजार ९६९ हेक्टरवर रोवणी आटोपली होती. एकूण क्षेत्राच्या केवळ २४.७५ टक्केच रोवणी झाली आहे.
रोवणी झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांमध्ये सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी आहेत. मोठ्या हिमतीने त्यांनी रोवणी केली. परंतु, आता वीज वितरण कंपनीही दगा देत आहे. वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा आणि भारनियमन यामुळे सिंचन करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते १९ जुलै या काळात ४०९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. सरासरी पाऊस योग्य असला तरी हा पाऊस काही विशिष्ट दिवसांतच पडला. त्यानंतर प्रचंड उकाडा वाढला. त्यामुळे अपेक्षित पाऊस असला तरी त्याचा रोवणीसाठी मात्र कोणताही फायदा झाल्याचे दिसत नाही.
बॉक्स
प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन नर्सरीत पेरणी केली. आता पाऊस बेपत्ता झाल्याने नर्सरीतील पऱ्हे सुकू लागले आहेत. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी ओलीत करीत आहे. मात्र, कोरडवाहू शेतकरी प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा करीत आहे. गोसे, बावनथडी या प्रकल्पाचे पाणी रोवणीसाठी सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. परंतु, अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
बॉक्स
जिल्ह्यात झालेली रोवणी
तालुका एकूण क्षेत्र प्रत्यक्ष रोवणी टक्केवारी
भंडारा २१३०६ ३२०६ १५.०५
मोहाडी २७०९६ २५७२ ९.४९
तुमसर २७५६९ ३४८१ १२.६३
पवनी १८६१२ १२०५७ ६४.७८
साकोली १८५०१ ४२४८ २२.९६
लाखांदूर २५७७६ ७९३९ ३०.०८
लाखनी २२६३१ ६४६४ २८.५७
एकूण १६१४९३ ३९९६९ २४.७५
बॉक्स
तालुकानिहाय पाऊस
भंडारा ३४९.६ मिमी
मोहाडी ४२२ मिमी
तुमसर ४३५.५ मिमी
पवनी ४५६.८ मिमी
साकोली ५२९.३ मिमी
लाखांदूर ४१९.४ मिमी
लाखनी ४८६.९ मिमी
एकूण ४३२.९ मिमी.