शेतीचे नुकसान : ७०० नागरिक बेघरचुल्हाड (सिहोरा) : सिंदपुरी गावात तलावाची पाळ फुटल्याने दोनशेहून अधिक घरात पाणी शिरले. आता ही घरे खचायला सुरूवात झाली आहे. नुकसानग्रस्तांना मदत घोषित झालेली नसून जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली.सिंदपुरी गाव शिवारातील १५० एकरातील तलावाची पाळ फुटली. या तलावातून जाणारे पाणी गावात शिरले. यामुळे आपादग्रस्तांची सुविधा शाळा आणि समाज मंदिरात करण्यात आली आहे. बेघर कुटूंबियांचे गावकरीच कैवारी झाले आहेत. गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून बेघर कुटूंबियांना आधार दिला आहे. ज्या घरात तलावाचे पाणी शिरले आहे अशा घरात वास्तव्याची भिती बळावली आहे. गावातील तलावांचे पाणी ओसरताच घरांचे खचणे सुरू झाले आहे. काही घरे एक ते दोन फुटपर्यंत जमिनीत खचले आहे. याशिवाय अनेक घरांच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. ४५० घरे असलेल्या या गावात अर्ध्याधिक घरे पाण्यात आहेत. तलावातील पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. या पाण्यामुळे सिंचीत होणारी १५० एकर शेती बाधित झाली आहे. या शेतीत धानाची रोवणी करता येणार नाही. याशिवाय तलावाच्या पाण्याने धानाची नर्सरी वाहून गेली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध करणे अडचणीचे झाल्यामुळे गावकरी संकटात सापडले आहेत. गुरूवारला जिल्हाधिकारी माधवी खोडे यांनी गावाला भेट देऊन तलावाची पाहणी केली. बेघर कुटूंबियांची विचारपूस केली. याशिवाय अंशत: व पुर्णत: नुकसानग्रस्त घरांचे सर्वेक्षणाचे निर्देश यंत्रणेला दिले. शेतीचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. परंतु मदतीची सोय मिळाली नाही. जिल्हा परिषद शाळा अधिक काळ बंद ठेवता येणार नाही. बेघर कुटूंब जीर्ण घरात जाण्याच्या तयारीत नाहीत. सर्वेक्षणानंतर मदत वाटपाला विलंब लागणार आहे. यादरम्यान उद्या दि.२६ रोजी सिंदपुरी येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनात ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कलाम शेख, वामन सिंगनजुडे, सुंदर बोरकर, देवानंद वासनिक, बिंदू मोरे, मोतीलाल ठवकर यांनी केले आहे. (वार्ताहर)दोन विभागात जुगलबंदीसमाज मंदिरात आयोजित बैठकीत लघु पाठबंधारे विभाग स्थानिकस्तर तथा लघु पाठबंधारे विभाग कार्यकारी अभियंता उपस्थित होते. हे दोन्ही कार्यकारी अभियंता एकमेकांकडे बोट दाखवित होते. एकमेकांना माझ्या अधिकार क्षेत्रात हा तलाव नाही, असे सांगत होते. या तलावावर शेतकऱ्यांची मालकी आहे. टेमणी, मांगली, मोहाडी खापा, सिंदपुरी गावातील शेतकऱ्यांची शेती आहे. तलावांच्या पाळीचे रोहयो अंतर्गत मातीकाम करण्यात आले आहे. संततधार पावसाने पाळ फुटल्यामुळे नुकसान झाले. आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
सिंदपुरीत जीर्ण घरांचे खचणे सुरूच
By admin | Updated: July 26, 2014 01:26 IST