मोहाडी : जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्याला शासन व राजकीय पुढारी गोंजरवितात पण, प्रत्यक्षात तसं काही होत नाही. तथापि, प्राथमिक स्त्रोत समजणारी शेतीला अलिकडच्या काळात केवळ जगण्याचं साधन मानलं गेलं आहे. आता ही शेती न परवडणारीच आहे, असे प्रत्येक शेतकरी बोलून दाखवित आहेत.पूर्व विदर्भात असणाऱ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये भाताचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी परंपरागत शेती भात पिकाचीच आहे. पूर्वी शेती प्राथमिक स्त्रोताची मानली जायची. अलिकडच्या काळात प्राथमिक स्त्रोत दुध दुभत्याला देवू लागली आहेत. धानाची शेती फक्त शेतकऱ्यांच जीवन जगण्याचा साधन झाली आहे. जगणारे घटक वाढले असल्याने शेतीत राबणे आता न परवडणारी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.धान पिकाच्या उत्पादनासाठी शेतकरी साधारणत: सहा-सात महिने शेतात राबतो. घरापर्यंत धान्य येण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच कार्यपद्धतीतून जावे लागते. धान शेतीचा हंगाम सुरू मे मध्ये सुरू होते. शेतातील अनावश्यक काडी कचरा नष्ट करणे, पऱ्हा लावणीसाठी जमिन तयार करणे, चिराटा, पऱ्हा घालणे, सिंचन करणे, रोप वाढली त्यासाठी चिखल तयार करणे, पऱ्हा काढणे, रोवणी लावणे, खत देणे, निंदन करणे, धानकापणी, धान एकत्रीत करणे, मळणी त्यानंतर उत्पादित झालेला धान्य घरी आणणे. शेवटी त्याची विक्री करणे आदी प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला साधारणत: पंधरा ते १७ हजार रूपयाचा एकरी खर्च येत असतो. उत्पादित धानाचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांकडे काहीच उरत नाही. त्यामुळे धान उत्पादित करणारा शेतकरी कर्जातच मातीत मिसळतो. धान उत्पादक करणारा शेतकरी संपन्न परिस्थितीत जीवन जगत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. त्यामुळे थोडे चांगले जीवन जगण्यासाठी शेतकरी दुध दुभते, शेळीपालन, कोंबडी पालन या पुरक व्यवसायाकडे वळला आहे. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दुध दुभते. व्यवसायाला प्राथमिक स्त्रोत मानू लागला आहे. ज्या भागात सिंचनाची सोय नाही कोरडवाहू शेती आहे या भागातील ९० टक्के शेतकरी दुध दुभते, बकऱ्या व कुक्कूटपालनाचा आधार घेत आहेत. ५० वर्षापुर्वी शेतीचा सकल स्थूल उत्पन्न ५० टक्के होता. आता तो १४ टक्के झाला आहे. त्यामुळे शेतीचा सेक्टर अतिशय गरीब झाला आहे. शेतकऱ्यांनी आता शासनाच्या भरवश्यावर राहू नये. तसेच शेती परवडत नाही हा ओरडा करू नये. स्वत:च शेतकऱ्यांनी पर्याय शोधले पाहिजेत. पीक बदलविला पाहिजे. ऋतू हवामानानुसार शेती केली पाहिजे. ज्या पिकाची किंंमत जास्त आहे. त्या पिकाचे उत्पादन केल गेलं पाहिजे. परिस्थिती साधून शेतकऱ्यांनी शेती करावी. ज्ञानाची तंत्रज्ञानाची शेती करण्याची गरज आहे. कारण तांदूळ हा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे भविष्यात धानाच्या किंमतीत वाढ होईल याची शाश्वती कमीच आहे. यासाठी शासनाने आधारभूत केंद्रातून धानाची किंमत वाढली पाहिजे, अस करण्यासाठी शासनच पुढे येवून शेतकऱ्यांना तारू शकतो. तसेच राज्य, प्रांतानुसार किमान आधारभूत किंमत असली पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)
प्राथमिक स्त्रोताची शेती न परवडणारीच
By admin | Updated: August 27, 2015 00:59 IST