लाखोरी येथील प्रकार : केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीलाखोरी : लाखोरी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रा अंतर्गत २१ नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू असून या केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लुट केली जात आहे. वजन करताना ४० कि़लाग्रॅम सोबत गोंताडाचे दोन रिकामी पोती सुद्धा मांडले जातात, असे जिल्ह्यातील कोणत्याही धान खरेदी केंद्रावर आढळून येत नाही.वजनमापन विभागाचे ४ अधिकारी एमएच ४० केआर ८२३५ या गाडीने लाखोरी धान खरेदी केंद्रावर आले. तेव्हा उरकुडे नामक एका महिलेचे मोजमाप केलेले धानाचे ४९ पोते या अधिकाऱ्यानी पुन्हा मोजले. तेव्हा प्रत्येक ४० किलोच्या पोत्यात ३ ते ४ किलो धान्य अधिकचे आढळून आले. हा प्रकार गावातील काही लोकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला.या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे दिवसभर धान मोजले जाते. मात्र पोत्यांची शिलाई केली जात नाही. सायंकाळी सर्व हमाल धानाच्या पोत्यांचा पुन्हा काटा करतात आणि प्रत्येक पोत्यातील अधिकचा माल गोळा करून आपल्या विश्वासातील शेतकऱ्याच्या नावे चढविला जातो व पैशाची उचल केली जाते. यात हमालांना सोबतच राईसमील कार्यकारणीचे लोक सहभागी असून संगनमताने ही लुट सुरू आहे. दरवर्षी असेच करून लाखो रूपयाचा चुना शेतकऱ्यांना लावला जात असल्याचे या केंद्रावर हमाली केलेले काही हमाल सांगत आहेत. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे. फिरते पथक नेमून या केंद्रावर २४ तास पाळत ठेवावी, तसेच जिल्हा फेडरेशनने धान खरेदी केंद्रांना ईलेक्ट्रानिक काटे देवून शेतकऱ्याची आर्थिक लुट थांबवावी. गोदामातील संपूर्ण माल पुन्हा मोजून वाढीव धान्य या केंद्रावर धान मोजलेला शेतकऱ्यांचे नावे दर्ज करावे, अशी मागणी लाखोरी व परिसरातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
धान खरेदी केंद्रावर लूट
By admin | Updated: December 15, 2015 00:47 IST