आर्थिक संकट : शेतकऱ्यांचे नियोजन बिघडणारकुंभली : सध्या खरीप हंगामाचे हलक्या व भारी धानाचे पीक निघाले असून बळीराजाची धान मळणी जोरात सुरु आहे. बळीराजा मोठ्या उत्सुकतेने धान मळणी करीत आहे. धानाचे पीक हाती येईपर्यंत लागणारा खर्च उदा. बियाणे, खत, मजूरी, मशागत, कापणी, मळणी इत्यादी निघून बाकी संसाराचा खर्च कसा भागवायचा या उद्देशाने शेतकरी मोठ्या आशेने मेहनत घेतो. परंतु धानाला उतारा नसल्यामुळे व धानाया योग्य भाव नसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत अधिक भर पडत आहे.त्यातल्या त्यात निसर्गाचा लहरीपणा, निसर्गाचा प्रकोप, अपूरा पाऊस, धानावर आलेले रोग व त्यासाठी लागणारा औषधांचा खर्च परवडणारा नसला तरी हातचे पीक जाऊ नये यासाठी आलेला खर्च व जीवाचे रान शेतकऱ्याला करावेच लागते. परंतु मळणीनंतर त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. धानाला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे वर्षभराचे नियोजन हे धान विक्रीवर अवलंबून असते. परंतु धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे. जून-जुलै मध्ये पेरणी केलेल्या धानाचे उत्पादन डिसेंबर-जानेवारीमध्ये होत असते. त्यानुसार शेतकरी वर्षभराचे नियोजन करतो व उर्वरित धान विक्रीला काढतो. तसेच घेतलेला पीक कर्जाची परतफेड मार्च अखेरपर्यंत करायची असल्यामुळे धान विक्रीला काढतो. परंतु धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे या जगाच्या पोशिंद्यासमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे.याकरिता शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा व या आर्थिक विवंचनेतून बळीराजाला बाहेर पडण्यासाठी प्रतिनिधीनी व सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे. (वार्ताहर)
धान मळणी जोरात सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2015 00:27 IST