दूषित पाण्याचा पुरवठा सुरुच : तत्काळ उपाययोजनेची गरजकरडी (पालोरा) : करडी येथे नळाच्या दूषित पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. गावात विविध आजारांची सुरु झालेली साथ अजूनही पूर्णत: आटोक्यात आलेली नाही. हगवण, उलटी, कावीळ, ताप आदी जलजन्य आजाराचे रुग्ण अजूनही गावात आढळून येत आहेत. नागरिक नळाचे पाणी पिण्यास घाबरतात. एवढी दहशत नळाचे पाण्याने निर्माण केली आहे. दूषित पाण्याच्या प्रकोपाला दोषी कोण, याचा तपास आरोग्य विभागाने केला असला तरी उपाययोजना मात्र तोकड्याच आहेत. करडी हे परिसरातील महत्वाचे बाजारपेठेचे गाव असून २७ गावांचा थेट संपर्क या गावाशी येतो. खरेदी व्यवहार असो की आरोग्य सुविधा, कोणत्याही गोष्टीसाठी करडी गावाशिवाय पर्याय नाही. मात्र करडी गावात येण्यास परिसरातील नागरिक घाबरत आहेत. दुकानदारांनी पिण्याचे पाणी हाती दिल्यास पाणी कुठले आहे, नळाचे तर नाही याची विचारणा अगोदर केली जाते. त्यातच गावात विविध आजाराची साथ असल्याने लहान मुले घेऊन गावात येण्याचे बरेचदा टाळले जात आहे. नागरिकांंमध्ये पिण्याच्या पाण्याने प्रथम प्रचंड दहशत निर्माण केली आहे. पाण्याचे महत्त्व आज नागरिकांमध्ये पदोपदी जाणवत आहे. पाणी म्हणजे जीवन ही शिकवण आज समजली आहे. करडी येथे आजही दूषित पाण्याचा पुरवठा सुरु असल्याची माहिती नागरिकांनी दिली. अहवालात पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. जलजन्य आजाराचे रुग्ण आजही गावात दिसून येत आहेत. त्यासाठी तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे. दूषित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याला दोषी कोण असा आजही नागरिकांकडून विचारला जात असला तरी जि.प. आरोग्य विभागाने दोषी कोण याचा खुलासा झालेला असल्याने आता उपाययोजना महत्त्वाची, असा सूरही नागरिकांमधून येत आहे. (वार्ताहर)
पाणी नव्हे विष !
By admin | Updated: June 21, 2014 23:49 IST