भंडारा : हिंदू-मुस्लिम बांधवांच्या आस्था व एकतेचे प्रतिक अशी तुमसर तालुक्यात अंबागड नजीकच्या पर्वताच्या हिरव्यागार वनश्रीत बंदरझिरा परिसर आहे. येथील सै. सिद्दीक शाह रह. अलैह यांच्या दर्ग्यावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी १६ मे रोजी उर्सनिमित्त हजारो भाविक हजेरी लावणार आहेत. या परिसराशी परिचित व ग्रीनहेरिटेज पर्यटन, पर्यावरण संस्थेचे संस्थापक मो. सईद शेख यांचे अनुसार ३०० वर्षापुर्वी या परिरातील हजारो एकर क्षेत्रात अत्यंत दाट जंगल होते. कुठेही पाण्याचे झरे, तलाव, नद्यांचा पत्ताच नव्हता. भयानक दुष्काळ वेळी परिसरातील लोकांचे बेहाल झाले होते. अशातच अचानक अरब येथून बाबा सिद्दीक शाह बाबा व त्यांचे शिष्य बाबा बासगीर यांचे या ठिकाणी आगमन झाले, असे सांगण्यात येते. बंदरझिरा येथे गुहेत राहून संपूर्ण मानवजातीच्या कल्याण, सुख, समृद्धी, संपन्नता, शांति करिता प्रार्थना केली. परिणामत: संपूर्ण परिसरात खूप वर्षा झाली. अनेक वर्षांपासून आटलेले जलस्त्रोत तुडूंब भरून वाहू लागले. सगळीकडे नवचैतन्य निर्माण होवून सुख-समृद्धिची पहाट उगवली. पहाडाच्या आतून गोड पाण्याचा झरा सतत वाहू लागला जो आजतागायत वाहत आहे. येथे विविध प्रजातिचे पशु, पक्षी, जनावरे विशेषत: वानरांचे (बंदरांचे) कळप पाणी प्यायला यत असल्याने या स्थळाचे नाव बंदरझिरा असे पडले. वर्षाऋतुत ढग येथील पर्वताशी चिकटून एक विलोभनीय दृश्य उपस्थित करतात तर पक्षींचा कलरव ही चोहीकडे सौंदर्यात भर घालते. दर्ग्यावर दरवर्षी हिंदू-मुस्लिम भाविक एकत्रित होवून सुख, समृद्धि, शांति, सामाजिक एकात्मतेकरिता प्रार्थना करतात. भंडारा येथून ४५ कि़मी. मिटेवानी येथून चालताना दर्ग्यापर्यंत जंगलातील वन सौंदर्य व जलाशयाचा भाविक मनमुराद येथे आनंद लूटताना दिसतात. येथून जवळच डावीकडे ऐतिहासिक अंबागड किल्ला व पर्वतीय क्षेत्र आहे. बंदरझिरा येथील उर्स २-३ दिवस चालतो. अधून मधूनही भाविक व पर्यटक येथे भेट देतात. या दर्ग्याला पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून विकसीत करण्याकरिता अनेक वर्षापासून शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण शारून व संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहेत. (प्रतिनिधी)
निसर्ग सौंदर्याने नटलेले ‘बंदरझिरा’
By admin | Updated: May 15, 2015 00:31 IST