बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू : सरकारने दिली आठ लाख रूपयांची आर्थिक मदत, वनविभागाकडून मृत मुलीच्या वडिलाला रोजगार लाखनी : आजीसोबत शेतात गेलेल्या खुशी राजु सराटे या चार वर्षीय बालिकेला बिबट्याने ठार केले. या घटनेला वनविभाग दोषी असून २० लाख रूपयांची आर्थिक मदत द्यावी, वडिलाला नोकरीवर सामावून घ्यावे अन्यथा शवविच्छेदनासाठी मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे चिखलाबोडी गुरूवारला सकाळपासून तणावपूर्ण स्थिती होती. परिणामी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या घटनेची माहिती होताच खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार, माजी आमदार सेवक वाघाये यांनी सराटे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. राज्य शासनाच्या वनविभागातर्फे सराटे कुटुबीयांना आठ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. सरपनासाठी लाकडे आणताना हे वनरक्षक महिलांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी संतप्त जमावाने केला. त्यानंतर उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी या घटनेला जबाबदार असलेले वनरक्षक जाधव व वनरक्षक धकाते या दोघांच्या तातडीने निलंबनाचे आदेश दिले. याशिवाय मृत मुलीच्या वडिलांना २९८ रूपये मजुरी याप्रमाणे दररोज काम देण्याचे आश्वासन दिले. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळाहून २०० मीटर अंतरावर पिंजरे लावण्यात आले आहेत. बीटरक्षक आर.आर. चवरे, पी.एस. मस्के, वनमजूर जी.एस. मेंढे यांना याठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ वाजता मृत बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखलाबोडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्यात येतो. चिखलबोडी, दैतमांगली, गोंडसावरी या कोका-करडी वन्यजीव अभरण्याला लागून असलेल्या गावात वन्यप्राण्याची दहशत आहे. गावकऱ्यांची जनावरे वन्यप्राणी मारतात. एखाद्या वन्यप्राण्यांची शिकार झाल्यास गावातील लोकांना वेठिस धरले जाते. त्यामुळे वनकर्मचारी व अधिकाऱ्यांविरूद्ध संताप नागरिकांनी व्यक्त केला. मृत बालिकेच्या कुटूंबियांना आर्थिक मदत द्यावी यासाठी गावकऱ्यांनी शवविच्छेदन व अंत्यसंस्कारास नकार दिला होता. गावकरी व वनविभागाचे कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने लोकांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयग्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
चिखलाबोडीत तणाव दोन वनरक्षक निलंबित
By admin | Updated: December 23, 2016 00:28 IST