साकोली : तालुक्यातील परसोडी सौंदड येथे मागील एक महिन्यापासून डेंग्यु आजाराची लागण सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ४० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आज बुधवारला पहाटे निशा प्रभु इरले (१६) रा. परसोडी या तरुणीचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापुर्वी निशाची बहिण भूमिता हिचा डेंग्यू या आजाराने मृत्यु झाला होता.परसोडी येथे मागील एक महिन्यापासून डेंग्यु आजाराची साथ सुरू आहे. २७ जुलै रोजी भूमिता गोटेफोडे या महिलेचा मृत्यू झाला. भूमिताच्या मृत्युनंतर जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन गावात जनजागृती मोहीम राबविली. आरोग्य शिबिर लावले, नाल्यांची सफाई करण्यात आली. मात्र डेंग्युचा साथीवर नियंत्रण आणण्यात यश आले नाही.निशा इरले हिला १५ दिवसापासून डेंग्यू आजाराने ग्रासले होते. तिच्यावर आधी साकोली रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे निशाचा मृत्यु झाला. तिचा भाऊ वाल्मीक इरले (१२) हा याच आजाराने ग्रस्त असून त्याचेवरही नागपूर येथे उपचार सुरू आहेत. सध्या परसोडी येथील २० ते २२ जणांवर साकोली येथे उपचार सुरू असून निशाच्या मृत्युमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी डॉ.खोडे यांनी परसोडी येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला होता. (तालुका प्रतिनिधी)
परसोडीत पुन्हा एका मुलीचा डेंग्यूने मृत्यू
By admin | Updated: August 20, 2014 23:21 IST