ग्रीन किडस्ने दिली संधी : नरेंद्र मोदींच्या भेटीने भारावला भंडाऱ्याचा आदित्य जोगीभंडारा : लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु झाली, तेव्हापासून नरेंद्र मोदी हे नाव आणि या नावाची व्यक्ती मी टिव्हीवर पाहात होतो. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले, अन् त्यांचा टिव्हीवरचा वावर आणखी वाढला. तेव्हापासून या व्यक्तीप्रती एक वेगळेच आकर्षण वाटायला लागले. मात्र भविष्यात कधीही आपण त्यांना भेटू शकू, असे स्वप्नातही वाटले नाही. ‘लोकमत’च्या ग्रीन किड्स या स्पर्धेत विजयी झालो अन् ही संधी माझ्याकडे चालून आली. संसदेच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासमोर होते. अन् चक्क मराठीत विचारत होते, ‘कसे आहात तुम्ही?’ मला तर अजूनही तो क्षण स्वप्नासारखाच वाटतो, अशा भावना आपल्या शब्दात भंडाराच्या आदित्य अल्का जोगी या विद्यार्थ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ग्रीन किड्स या स्पर्धेत विजयी झालेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. मोदींच्या भेटीने भारावलेल्या या विद्यार्थ्यांना हवाई सफारीसह देशाच्या राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली. क्षणक्षणाला उत्सुकतामोदी भेटीचे वर्णन करताना आदित्य म्हणाला, सकाळच्या सुमारास नागपुरच्या विमानतळावरून प्रवास सुरु होताच मनात घालमेल सुरु झाली. पंतप्रधानांना भेटल्यावर आपण काय बोलावे हा प्रश्न मनात सतत घोंगावत होता. एक तास ४२ मिनिटांचा प्रवास संपवून दिल्ली विमानतळावर पोहचल्यावर धाकधुक वाढली. क्षणाक्षणाला पंतप्रधानांच्या भेटीची उत्सुकता वाढत होती. भव्य संसद अन् गर्दीबसमध्ये आम्ही सर्व विजयी स्पर्धक व लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी राजधानीतील विविध वास्तू दाखविले. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहिल्यावर संसदेत दाखल झालो. एवढी मोठी गोल व उंच इमारत पहिल्यांदाच पाहिली. संसदेत खूप लोक होते. आम्ही सर्व विद्यार्थी एका खोलीत दाखल झालो. काही वेळातच काही गार्ड आले. त्यांनी सर्व फेरफटका मारला. पंतप्रधानांनी अमूल्य वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, मुलांनो खूप शिका, अभ्यास करा व मोठ्या पदावर पोहोचून देशाची सेवा करा. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांना भेटून स्वप्नवत वाटते
By admin | Updated: July 12, 2014 23:30 IST