भंडारा : वरिष्ठांकडे पाठविण्यात येणाऱ्या अहवालानंतर तुला नोकरी गमवावी लागेल, असे सांगून कनिष्ठ कर्मचाऱ्याची पिळवणूक करणाऱ्या सावरला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अमर शेंडे (५२) याला सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. पवनी तालुक्यातील सावरला प्राथमिक आरोग्य केंद्रात अमर शेंडे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अधिनस्थ परिविक्षाधिन सहाय्यक कनिष्ठ कर्मचाऱ्याला नोकरी वाचविण्यासाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणाऱ्या अहवालासाठी सहा हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास तुमचा खोटा अहवाल पाठविण्यात येईल. यात तुम्हाला नोकरी गमवावी लागेल, अशी तंबी दिली.लाच देण्याची परिस्थिती नसल्यामुळे फिर्यादीने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचेची रक्कम देण्याची कबुली करुन सापळा रचण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यानुसार डॉ.शेंडे याला पवनी येथे त्यांच्या राहत्या घरी रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
लाच घेताना वैद्यकीय अधिकारी जाळ्यात
By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST