समितीची बैठक : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहनभंडारा : जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टीकोनातून शांतता व जातीय सलोखा कायम ठेवून उत्सव आनंद व उत्साहात साजरे करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक विनीता साहू जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस बहुद्देशिय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, भंडारा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तुमसर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले,भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी श्री. देवतळे, भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जोगदड, तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी साळी उपस्थित होते.विनीता साहू म्हणाल्या, जिल्हयात शांतता व सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. या बैठकीत आलेल्या सामाजिक संघटनेच्या सदस्यानी कोणतेही असामाजिक घटना घडू नये याबाबत परिसरात जनजागृती करावी. साकोली येथे हिंदु, मुस्लीम, बौध्द यांच्या संघटनांनी एकाच ठिकाणी भगवा, हिरवा निळया पताका लावून जी सर्वधर्मसमाभावाची भावना जागृत केली हे जिल्हयासाठी प्रशंसनीय बाब आहे. कोठेही असामाजिक घटना घडल्यात तर त्याविषयी पोलीस प्रशासनास तात्काळ कळवावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याविषयी जनतेने सतर्क रहावे. होळीच्या सणात कोणीही रासायनिक युक्त रंगाचा वापर करु नये त्यामुळे शारिरास इजा होते. तसेच अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. याबाबत मुलांना सुध्दा मार्गदर्शन करणे आपली जबाबदारी आहे. उपजिल्हाधिकारी विजया बनकर म्हणाल्या, जनता व प्रशासन यांच्यात सुसंवाद असला पाहिजे. होळीच्या सणादरम्यान महिला छेडछाड प्रकार होऊ नये. त्यासाठी मद्य प्राशन करुन कोणीही रंग खेळू नये तसेच राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने पाण्याचा जपून वापर करावा.पाणी टंचाई सर्वत्र असल्याने नागरिकांनी याचे भान ठेवावे. जिल्हा प्रशासन या घटनावर सुक्ष्म लक्ष ठेवून आहे. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी काबरा यांनी या सणादरम्यान सर्वांनी सदभावनेने वागून सामाजिक बांधिलकी कायम ठेवावी. तसेच प्रत्येक समुदायांनी आपले सण साजरे होताच त्याबाबतचे बॅनर व पोस्टर काढून टाकावे यामुळे समाजात वाद उदभवणार नाही, असे आवाहन केले. अमृत बन्सोड म्हणाले, भंडारा शांतताप्रिय शहर म्हणून प्रसिध्द आहे. असामाजिक तत्वांना चालना देवू नये असे सांगितले. सर्वधमिंर्यानी एकमेकांच्या सणात सहभागी होवून सण साजरे करावे, यामधून एकात्मतेचा संदेश मिळेल, असे उपस्थितांनी सांगितले. शांतता व जातीय सलोखा बैठक तिमाही न ठेवता दर महिन्याला घेण्यात यावी, अशी सूचना केली. यावेळी रशिद कुरेशी, यशवंत थोटे, हिवराज उके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन परिविक्षाधिन पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी तर श्री. साळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला जिल्हयातील शांतता समितीचे सदस्य तसेच पोलीस अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जातीय सलोखा कायम ठेवा
By admin | Updated: March 23, 2016 00:47 IST