विरली (बुज): शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणी दोषींवर कारवाई आणि एका शिक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी पाहुणगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला दि. १९ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यास शिक्षण विभाग असमर्थ ठरल्याने मागील तीन दिवसांपासून ही शाळा कुलूपबंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पाहुणगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ चे वर्ग असून १५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील शैक्षणिक सत्राच्या शेवटी या शाळेत पोषण आहार योजनेतील ८८ किलोे तूर डाळ, ३२ किलो चना डाळ व ३० किलो मसूर डाळ असे सुमारे दीड क्विंटल धान्य शिल्लक होते. मात्र येथील मुख्याध्यापकांनी शाळेतील एका शिक्षकाला धान्य विकल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून केंद्र प्रमुख ई.के. सुखदेवे आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एल.डब्लू. मेश्राम यांनी या धान्य घोटाळ्याची चौकशी करून मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक तोंडरे दोषी असल्याचे शिक्कामोर्तब केले. हा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. मात्र दोषींवर काहीच कारवाई न झाल्याने गावकरी संतप्त झाले. त्याचप्रमाणे येथील सहाय्यक शिक्षक आर.एम. तोंडरे यांच्या बदलीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने ठराव संमत करून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला. मात्र गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केवळ एका शाळा व्यवस्थापन सदस्याचे बयाण प्रमाण मानून सदर शिक्षकाचे बदली प्रकरण थंडबस्त्यात टाकले. कोणत्याही मागण्या अर्ज व विनंती मान्य होत नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी १९ आॅगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकले. लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जी.के. पडोळे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी टी.बी. अंबादे यांनी शाळेला भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षकाची तडकाफडकी बदली शक्य नसल्याचे सांगितले. गावकरी बदलीसाठी ठाम राहिल्याने बोलणी फिस्कटली. गेल्या तीन दिवसांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या नुकसानीसाठी वरिष्ठ अधिकारी कारणीभूत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. पहिला दिवस वगळता गत दोन दिवसात शिक्षण विभागाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा लोक प्रतिनिधींनी शाळेला भेट दिली नाही. गटशिक्षणाधिकारी पडोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या शाळेत एक पदवीधर शिक्षण देऊन तोंडरे यांना अतिरिक्त दाखवून नंतर त्यांची बदली करण्याचा प्रस्ताव आंदोलनकर्त्यांसमोर ठेवला असल्याचे सांगितले. मात्र गावकरी मानायला तयार नसल्याने त्यांनीही याप्रकरणी हात टेकले. या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर दोनाडकर, उपाध्यक्ष कविता हटवार, सरपंच देवीदास राऊत, उपसरपंच गोपाल मेंढे, माजी सरपंच रेवाराम निखाडे, अभिमन ढोंगे, दिनेश कोरे, राजेंद्र कोरे, शिवशंकर वाघमारे, हरिदास पोराम, अल्का गायधने व गावकरी सहभागी आहेत. (वार्ताहर)
पाहुणगावातील शाळा तिसऱ्या दिवशीही कुलूपबंद
By admin | Updated: August 21, 2014 23:39 IST