भंडारा : पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला गेला. या पार्श्वभुमीवर त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार ‘जिवनोन्नती उपक्र म’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मशरुम (अळींबी) लागवड करण्यात येत असून प्रकल्पबाधितांचे आर्थिक स्थैर्य मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.गोसेखुर्द प्रकल्प हा राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्पप आहे. या प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. त्यांच्या हातचा रोजगार सुटला. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम देण्यात यावा, अशी मागणी शासनदरबारी अनेकदा करण्यात आली. आता या मागणीचा विचार करून नागपूर विभागीय आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ग्रामीण विकास यंत्रणेला निर्देश दिले. सदर प्रकल्पग्रस्तांसाठी जिवनोन्नती उपक्र मांतर्गत मशरूम (अळींबी) संवर्धन प्रकल्प राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.त्यानुसार जिल्हा प्रशासनाने भंडारा व पवनी तालुक्यातील सात गावांची निवड केली. यामध्ये भंडारा तालुक्यातील टाकळी, सिरसघाट, मकरधोकडा, बोरगाव तसेच पवनी तालुक्यातील मालची, सौंदड व पाथरी या गावांची निवड केली. सुरुवातीला ग्रामीण विकास यंत्रणा, आत्मा व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावात जावून गावकऱ्यांच्या सभा घेतल्या. त्यांना उपक्रमाची माहिती दिली. गावकऱ्यांनी हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगिल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले.निवड करण्यात आलेल्या गावातील प्रशिक्षणार्थ्यांची संख्या २१० आहे. या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये महिलांचा सहभाग उत्स्फुर्त आहे. या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून आता प्रत्यक्ष मशरूम उत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ दिवसानंतर मशरूमचे उत्पादन हाती येणार आहे. बाजारात ओल्या मशरूमला दीडशे ते दोनशे रूपये प्रति किलो तर वाळल्या मशरुमला ७०० ते ८०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो.यासाठी लागणारा लागवड खर्च २०० ते ३०० रुपये असल्याने ही शेती प्रकल्पग्रस्तांसाठी पर्वणी ठरणारी आहे. मशरूमचा वापर खाण्यासाठी, औषधी तयार करण्यासाठी होत असल्यामुळे त्याला मोठी मागणी आहे.
मशरुम शेतीतून प्रकल्पग्रस्तांची ‘जीवनोन्नती’
By admin | Updated: July 1, 2014 01:20 IST