पक्ष्यांचा संवाद तुटतोय : अन्नच मिळत नसल्याने अकाली मृत्यू, कर्कश आवाजांचाही धोकाभंडारा : अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची सादच हरविली आहे. याचे मुख्य कारण दिवसेंदिवस वाढत चाललेले ध्वनी प्रदूषण आहे. पक्षांचा आपसातील ध्वनीही संपुष्टात आला आहे. त्याची तीव्रता इतकी की नुकत्याच जन्मलेल्या व भूकेने व्याकूळ झालेल्या पिलांचाही आवाज आईपर्यंत पोहोचत नाही. पूर्वी पक्षी आपल्या पिलांना जसा आदेश द्यायचे, त्या आदेशाचे पालन इवलेसे जीव करीत होते. पण पक्ष्यांचा आवाज आता त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या पक्ष्यांचे आयुष्यच धोक्यात आले आहे. जसे एखादे बाळ खाण्यापिण्यासाठी, संरक्षणासाठी अवलंबून असते. पक्ष्यांची पिलंही पक्ष्यांवर अवलंबून असतात. आपल्या पिलांवर संकट आले असे लक्षात येताच पक्षी लगेचच आपल्या विशिष्ट आवाजात पिलांना सावध करतात. मात्र आता वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न आणि मानवनिर्मित इतर ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांचा आवाज पिलापर्यंत पोहोचत नाही. रहदारी, इमारतीचे बांधकाम किंवा इतर गोंगाटामुळे पिले आपल्या आईचा म्हणजेच पक्ष्यांचा आवाज ऐकू शकत नाही. त्यामुळे त्यांचा संवाद तुटतो आहे. हा संवाद तुटल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचत आहे. त्याचबरोबर अन्न, पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्याची संख्या कमी होण्याचे हेही कारण आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ध्वनी प्रदूषणामुळे जीवसृष्टीचे चक्र विस्कळीत
By admin | Updated: October 28, 2015 00:38 IST