मोहाडी : विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. इथे तर ना गुण ना दर्जा निर्माण करणारे गुरुजी नाहीत.गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र्र शासनाने ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करण्यात आली. यात मुलांची शैक्षणिक प्रगती उंचावत नेणे ही प्राथमिकता आहे. तथापि विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषय शिक्षकांची अतिशय कमतरता भासत असल्याने विद्यार्थ्यांच्या दर्जेदार व गुणात्मक शिक्षणाची आशा कशी करायची असा प्रश्न उभा होतो.प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तरात शासनाने सुधारणा केली आहे. त्यानुसार इयत्ता १ ली ते ८ वी प्राथमिक शिक्षण, इयत्ता १ ली ते ५ वी कनिष्ठ प्राथमिक इयत्ता ६ वी ते ८ वी वरिष्ठ प्राथमिक संबोधण्यात येणार आहे. ६ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये विज्ञान व गणित, सामाजिक अभ्यास व भाषा या प्रत्येक विषयासाठी किमान एक शिक्षक असले पाहिजेत असे निकष व मानके ठरविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कमी वयात शारीरिक सुदृढतेचे महत्व कळावे क्रीडा कौशल्य निर्माण व्हावे शिवाय कला क्षेत्रात कल्पनांचे मनोरे बांधावे, कार्यशिक्षण घ्यावे हा विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार आहे. पण आज स्थितीत विज्ञानाची दृष्टी देणारा विज्ञान व गणित शिक्षकांची मोहाडी तालुक्यात उणीव भासली आहे. आज तालुक्यात १४ बी.एससी.गणित, विज्ञान शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ तीनच बी.एससी शिक्षक कार्यरत आहेत. मोहाडी तालुक्यात ६ ते ८ वीच्या ४० शाळा आहेत. सध्या ७ वी ला ८ जोडणाऱ्या १३ शाळा सुरू झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. १ ते ५ वीचे सेमी इंग्रजीचे ८ वर्ग आहेत. म्हणजे सेमी इंग्रजीमध्ये गणित व विज्ञान या दोन विषयाचा समावेश होतो. या दोन विषयांना शिकवण्यासाठी बी.एस.सी अर्हताधारक शिक्षकांची आवश्यकता आहे. आज स्थितीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ६ ते ८ व्या वर्गांना विज्ञान व गणित विषय शिकविणारे शिक्षक केवळ १५ टक्के असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच १ ते ५ मध्ये सेमी इंग्रजी शिक्षणाचा दर्जा वाढविण्याची अपेक्षा करणाऱ्या शिक्षकांची कमी आहे. १ ते ८ वी पर्यंतच्या बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया खचत चालला असल्याचे स्पष्ट दिसून येतो. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम असला तरी दर्जेदार शिक्षण देणारा शिक्षकच उपलब्ध नसल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्याचे उपाय आपोआपच जागीच थांबत चालले आहेत. तसेच कलाशिक्षण, आरोग्य व शारिरीक शिक्षण व कार्यशिक्षण (कार्यानुभव) हे विषय शिकविण्यासाठी राज्यात एकही अंशकालीन निदेशक नियुक्त केले गेले नाहीत. प्रारंभी एक वर्ष कला शिक्षण व आरोग्य व शारीरिक शिक्षण व कार्य शिक्षक विषय शिकविण्यासाठी अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना नंतर कामावरुन कमी करण्यात आले आहे. आता अंशकालीन निदेशक कोर्टात गेले आहेत.आज स्थितीत शिक्षणाचा हक्क असताना कला गुणांना वाव देणारे, शारीरिक सुदृढता निर्माण करण्यासाठी शाळेत एकही शिक्षक असू नये ही शिक्षण क्षेत्राची शोकांतिका आहे.(तालुका प्रतिनिधी)
कला, आरोग्य विषयाचे शिक्षकांची उणीव
By admin | Updated: August 17, 2014 23:00 IST