लाखांदूर : यंदा पावसाळ्यात अद्यापही अतिवृष्टी न झाल्याने, शेतकरी व नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामात लागवडीखालील पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध न झाल्याने शेतपिके करपण्याच्या मार्गावर आहेत, तर पावसाच्या अभावाने वाढलेल्या उष्णतेने विविध आजारांनी नागरिक त्रस्त दिसून येत आहेत. या स्थितीत लाखांदूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या नजरा पावसाकडे लागल्या असून, सर्वत्रच काले मेघा, काले मेघा पाणी तो बरसाओ, असा आवाज दिला जात आहे.
यंदाच्या पावसाळ्यात खरीप हंगामादरम्यान शेतकऱ्यांद्वारे शेतात विविध पिकांची लागवड तर काही क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे. धानाची ही लागवड कृषी वीज पंप व गोसेखुर्द धरणाच्या नहरांद्वारे पाणी उपलब्ध असल्याने करण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून पावसानेे दडी मारल्याने धरणातील जलस्तर खालावले. परिणामस्वरूप भूगर्भातील जलस्तर कमी झाल्याच्या भीतीने शेतकरी व नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.
ईटियाडोह बांधअंतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील एकूण १७ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात बांध क्षेत्रात आत्तापर्यंत केवळ ६३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये किमान जलसाठा झाला नसल्याने गत दीड महिन्यापासून सिंचनासाठी नहरांना पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी, ईटियाडोह बांध लाभक्षेत्रात शेतकऱ्यांद्वारा आत्तापर्यंत खरीप हंगामाअंतर्गत धान पिकांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आला नाही.
यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही अतिवृष्टी झाली नाही. गतवर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान तीनदा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत हलक्या स्वरूपाचे पाऊस पडला आहे, तर उर्वरित दिवसांत ऊन व पावसाची स्थिती राहत असल्याने सर्वत्रच उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे शेतीकाम करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व नागरिकांत आजार वाढले आहे. ग्रामीण भागातील शासकीय व खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत असेच वातावरण राहिल्यास व पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या शेतपिकांसह नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागणार आहे.
बॉक्स
विविध संकटांपासून वाचण्यासाठी पावसाला हाक
पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतपीक करपण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे पावसाच्या अभावाने उष्णतेत वाढ होऊन नागरिकांसह शेतमजूर व बालकांत विविध आजार दिसून येत आहेत. कोरोना संकटामुळे गत काही महिन्यांपासून विविध संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांत पावसाळ्यामध्ये आरोग्य व पिकांच्या समृद्धीची अपेक्षा केली जात होती. मात्र, मागील दीड महिन्यापासून अपर्याप्त स्वरूपात पाऊस न पडल्याने, नागरिकांचे आरोग्य व पिकांवर निर्माण विविध संकटांपासून बचावासाठी नागरिक व शेतकऱ्यांद्वारे काले मेघा, काले मेघा पाणी तो बरसाओ, अशी हाक लावली जात आहे.