गोंडसावरी येथील प्रकार : दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरदहस्तलाखनी : अवैध वृक्षतोड वनविभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकीकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी केली जात असताना खासगी ठेकेदार, वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत आहेत. लाखनी वनपरिक्षेत्रातील घटना याचाच एक भाग मानल्या जात आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोडीचा हा गोरखधंदा केव्हा थांबणार असा प्रश्न समोर येत आहे.लाखनी वनपरिक्षेत्रातील गोंडसावरी बिटामधील कक्ष क्र. १०९ येथील संरक्षीत वनातील लाखो रुपयाच्या सागवन झाडाची अवैध कटाई झाली आहे .मात्र असे असताना वनविभाग व यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्याचा बचाव करताना दिसून येत आहे. त्यामुळे अजूनपर्यंत एकही वनअधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई झाली नाही.दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी शेतकरी रतीराम हजारे याला अटक करण्यात आली. तर ठेकेदार राकेश हजारे याला आज सायंकाळपर्यंत अटक करण्यात येईल अशी माहिती आहे. आरोपी ठेकेदाराने मागील १५ दिवसापूर्वी रेंगेपार (कोठा) येथील शेतकऱ्याचे मालकीचे व गोंडसावरी येथील रतीराम हजारे यांच्या मालकीचे जमिनीला लागून अतिक्रमीत गट नं. ४८५ मधील २७ सागवनाची झाडे स्थानिक वनअधिकारी व कर्मचाऱ्याशी संगनमत करून ही वृक्षतोड केली. मात्र त्याची वाच्यता कुठेली झाली नाही. सदर वृक्षाच्या परवानाबाबत वनविभागाच्या सर्व्हेक्षणात २७ झाडे संरक्षित वनाच्या हद्दीतील आहेत हे लक्षात येताच संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला. वरिष्ठांकडून वनअधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश मिळताच शनिवारी सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन संपूर्ण माल जप्ती केला. आरोपी ठेकेदाराने वनविभागाच्या रेंगेपार (कोठा) येथील खसऱ्यामधील सागवन झाडाची खरेदी केली होती. त्यानुसार वनविभागाने त्याला ती झाडे तोडून त्याची वाहतूक करण्याचा परवाना जारी करण्याची कारवाई सुरु केली होती. मात्र आरोपीने या खसऱ्यासोबत गोंडसावरी येथील कक्ष क्र. १०९ मधील २१ झाडांची अवैध कटाई केली. वनविभागाने केलेल्या चौकशीत येथे २७ नगाची अवैध कटाई झाल्याचे उघडकीस आले आहे.हा संपूर्ण माल ४५०० घनमीटर असून गोंडसावरी येथील अवैध वृक्षतोडीतील माल १.४६७ घनमिटर असल्याचे सांगीतले. याशिवाय घटनास्थळी २७ खुट आढळून आले. मात्र वनविभागाने त्यापैकी खुटाची मोजणी करून मालाची किंमत ३८ हजार रुपये आकारल्याची माहिती आहे. या संबंधी वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी बोलण्यास नकार देऊन कारवाई सुरु असल्याचे सांगितले. मी आज बाहेर असून लाखनीला परत आल्यानंतर बोलू असे बोलून प्रकरणाची गंभीरता लक्षात न घेता माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.सदर शेतकऱ्याने स्वत:च्या मालकी जागेतील झाडे असल्याचे दाखवून ठेकेदाराने खसरा तयार केला. मात्र शेत हे संरक्षित जंगलालगतच असल्याचे निदर्शनास येताच सर्वेक्षण करण्यात आले.त्यामध्ये अतिक्रमण केलेल्या जागेतील सर्व झाडे असल्याने जप्ती करण्यात आल्याचे वनपाल शेख यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
अवैध वृक्षतोडीला अभय कुणाचे?
By admin | Updated: July 1, 2014 23:19 IST