वरठी : थबकलेली रेल्वेची चाके धावायला लागली आहेत. पण सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासास मनाई आहे. विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट असल्याने साधारण प्रवाशांना घाम फुटत आहे. कोरोनासोबत जीवन जगायचे तंत्र नागरिकांना गवसले असले तरी रेल्वे विभागाकडून अजून किती दिवस लूट सुरू राहील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जनजीवन हळूहळू रुळावर येत असताना वाढलेले तिकिटाचे दर सामान्य केव्हा होतील याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.
भंडारा रोड रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. कमी खर्चात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेची ख्याती होती. रेल्वे प्रवास म्हणजे सामान्य माणसाचे जीव की प्राण असल्यासारखे आहे. गत १८ महिन्यांपासून शेकडो प्रवासी रेल्वे प्रवासापासून मुकले आहेत. मागील काळात अनेक महिने रेल्वे गाड्या बंद होत्या. दीर्घ काळानंतर रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा रुळावरून धावू लागली. पण रेल्वेच्या आरामदायी व सुरक्षित प्रवासापासून नागरिक अजूनही प्रवासी दूरच आहेत.
रेल्वे प्रवास करण्याकरिता निर्बंध असून मुंबई हावडा मार्गावर धावणाऱ्या जलदगतीच्या रेल्वेने प्रवास करण्याकरिता सामान्य तिकीट विक्री बंद आहेत. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास आरक्षण केल्याशिवाय शक्य नाही. यासाठी नियमित दराच्या दुप्पट रोखीने तिकीट उपलब्ध आहेत. रेल्वे प्रवास परवडणारा नाही.
मुंबई-हावडा मार्गावर उप-डाऊन धावणाऱ्या ३४ रेल्वे गाड्या सुरू आहेत. यात ३ साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. गोंदिया-इतवारी मार्गावर एकमेव सर्वसाधारण लोकल गाडी धावते. लोकल गाडीने प्रवास करण्यास निर्बंध नाहीत. पण कार्यालयीन किंवा व्यावसायिक दृष्टीने प्रवास करण्यास सदर रेल्वे गाडी सोयीची नाही. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या उर्वरित गाड्याने प्रवास करावयाचे असल्याचे आरक्षण असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. रेल्वेचे प्रवासी भाडे नियमित दराच्या दुप्पट असल्याने परवडणारे नाही.
तिकीट किमती दुपटीपेक्षा जास्त
सध्या स्थितीत रेल्वे आकारात असलेले प्रवासी भाडे दुप्पटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मानसिंग हिरापुरे यांनी दिली. ते तिरोडा तालुक्यातील एका खेडेगावातून वरठी सॅनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामावर आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पूर्वी त्याना प्रवास करण्याकरिता लोकल तिकीट १० रुपये लागायची. सध्या त्यांना ३० रुपये मोजावे लागत आहेत. एकंदरीत सर्व ठिकाणच्या प्रवासी तिकिटात सारखीच वाढ आकारल्या जात असल्याचे कळते.
आरक्षण बंद करण्याची गरज
रेल्वे विभागाकडून आरक्षणाच्या नावावर होणारी पिळवणूक बंद करण्याची मागणी येथील व्यापारी सुधीर बागडे यांनी केली आहे. सुधीर बागडे यांचे जनरल दुकान असल्याने त्यांना आठवड्यातून दोन-तीन वेळा नागपूर व गोंदिया येथे खरेदीला जावे लागते. कधी कधी जाणे ठरावीक नसते. ग्राहकाच्या मागणीनुसार धावतपळत खरेदीला जावे लागते. पण आरक्षणाचे निर्बंध असल्याने व्यवसायात नुकसानाला सामोरे जावे लागते. कोविडमुळे व्यवसाय डबघाईस आले असताना एखादी संधी मिळाली तरी रेल्वेच्या आरक्षण निर्बंधाने लाभ घेता येत नाही.
सामान्य प्रवास सुरू करण्याची गरज
रेल्वे प्रवास सुरक्षित व आर्थिक बाबतीत परवडणारे आहे. प्रवास करण्याकरिता असलेले निर्बंध हे नागरिकांच्या हिताचे आहे. कठीण काळ बघता सरकारने प्रवासबंदीच्या नियमात शिथिलता आणून सामान्य प्रवासाकरिता प्रवास निर्बंध विरहित करून जनजीवनाची घडी रुळावर येण्यास मदत करण्याचे मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिंगे यांनी केले.