लोकमत विशेषलाखांदूर : ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे, हा उद्देश ठेऊन शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु केले. मात्र हौसेने शिकण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आल्यापावली परतावे लागत आहे. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सकाळी कार्यालयीन वेळेत उघडत नाही. प्राध्यापक तसेच कर्मचारी संस्थेत उपस्थित राहत नाहीत. प्रशिक्षणार्थ्यांचे वर्ग घेतले जात नाही. ही संस्था केवळ नावापूरती ठरली असल्याचा आरोप ‘लोकमत’शी बोलताना विद्यार्थ्यांनी केला. येथील प्राचार्याकडे पवनी व लाखांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कार्यभार असल्याचे कळले. त्यामुळे हे प्राचार्य अनेक दिवस येथे भेट देत नाहीत. परिणामी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे काम मनमर्जीने सुरु आहे.विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यामुळे सदर प्रतिनिधीने आयटीआयला भेट दिली असता उपस्थित एका कर्मचाऱ्याला प्राचार्य व कर्मचाऱ्याबाबत माहिती विचारली असता मला माहित नाही, असे म्हणत कार्यालयात कशासाठी आले, असा उलटप्रश्न केला. त्यानंतर फेरफटका मारला असता बहुतांश ट्रेडच्या वर्गखोल्या प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत: कुलूप उघडून स्वच्छ करताना दिसले. वेल्डर आणि फिटर ट्रेडच्या विभागात ११ वाजूनही प्रशिक्षणार्थी नव्हते. या विभागाचे प्राध्यापकही अनुपस्थित होते. अशीच स्थिती मोटार मेकॅनिकल, ड्रेस मेकींग या विभागात दिसून आली. इलेक्ट्रानिक्स मेकॅनिकल या विभागाचे दार प्राध्यापक न आल्यामुळे बंद होते.त्यानंतर काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, वर्ग भरत नाही, प्राध्यापक दिवसभर वर्गात येत नाहीत, दररोज शिकविले जात नाही. विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाही तर या संस्थेत कुणाचाही कुणावर वचक नसल्याचे सांगितले. शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून याठिकाणी ईमारत बांधली. मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. शासनाकडून संस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या साहित्याचा काळजी घेतली जात नाही. परिणामी या साहित्याची दुर्दशा झाली आहे.सकाळी ११ वाजता एकूण २१ कर्मचाऱ्यापैकी केवळ आठ कर्मचारी उपस्थित दिसून आले. प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेल्या रजिस्टरवर त्यांच्या येण्याची नोंद दिसून आली असली तरी हे आठ कर्मचारी आपआपल्या विभागात न जाता वैयक्तिक कामात व्यस्त दिसून आले. परिणामी विद्यार्थी गप्पांमध्ये गुंतले होते. (तालुका प्रतिनिधी)आयटीआयमधून निघणारा विद्यार्थी हा कुशल कारागीर असतो. त्याची देशाला गरज आहे, हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्किल इंडिया’ साठी आयटीआयचा उल्लेख केला होता. असे असताना लाखांदूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणच मिळत नसल्यामुळे हे विद्यार्थी ‘स्किल इंडिया’साठी कसे पात्र ठरतील, हा विषय चिंतनाचा ठरला आहे.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी महागड्या साहित्याचा पुरवठा केला जातो. पंरतु प्रशिक्षण दिल्या जात नसल्यामुळे अनेक महागडे साहित्य गहाळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. साहित्याच्या नोंदी किंवा आॅडिट होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. या साहित्याचे आॅडिट झाल्यास साहित्य चोरीचे घबाड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कर्मचारी संस्थेत वेळेवर उपस्थित होत नसल्यामुळे प्रशिक्षणासाठी आलेले प्रशिक्षणार्थी वेळेत उपस्थित होऊन वर्गखोल्यांच्या चाव्या कार्यालयातून घेतात. त्यानंतर कुलूप उघडून वर्गखोली स्वच्छ करतात. त्यानंतर वर्गात बसतात. मात्र प्राध्यापक वर्ग दिवसभर गायब राहत असल्यामुळे शिकण्यासाठी आलेले प्रशिक्षणार्थी काही वेळ वाट पाहून घराकडे निघून जातात.प्रत्येक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते. तशीच व्यवस्था येथील प्रशिक्षणार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे. मात्र ज्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची मशिन आहे, तिथे अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थी समोरच्या पानटपरीवर जावून तहान भागवितात. प्रसाधनगृहाची साफसफाई होत नसल्यामुळे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी संस्थेच्या परिसरात लघुशंका करतात.
-तर विद्यार्थी घडणार कसे?
By admin | Updated: May 15, 2015 00:26 IST