भंडारा : मधुमेह, हृदयविकाराच्या जोडीला वाढता रक्तदाब ताप देत असल्याच्या तक्रारी भंडारेकरांमध्ये वाढलेल्या आहेत. पूर्वी चाळीशीत भेडसावणारा रक्तदाबाचा त्रास आता वयाच्या तिशीतही डोकेवर काढू लागला आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सन २०१४-१५ मध्ये ३ लाख १८ हजार ५११ जणांनी तपासणी केली. यात ३० हजार २८५ जणांना संशयित तर १४ हजार ६०७ जणांना उच्च रक्तदाब असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी सन २०१३-१४ मध्ये उच्च रक्तदाबाचे १५ हजार ७७१ रुग्ण आढळून आले होते.मधुमेहाइतकाच रक्तदाबाचा त्रास वाढण्याचे कारण म्हणजे ताणतणाव हे आहे. मागील काही वर्षात बदलेली जीवनशैली होय. संगणकासमोर तासनतास बसून राहिल्याने शरीराची हालचाल मंदावते. व्यायाम नसल्याने शरीराला अशक्तपणा वाढत जातो. याचा परिणाम स्थूलपणा येणे, विघटनशील द्र्रव्ये शरीरात साचत जाणे, त्यामुळे रक्तदाबाची पातळी वाढते. तेव्हा रक्तदाबाच्या व्याधीकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मानसिक ताण, व्यायामाचा अभाव, स्थूलपणा, आहारात स्निग्ध पदार्थांचा अतिरेक, तंबाखूसारखे व्यसन हे उच्च रक्तदाब वाढण्यास मदत करतात. कामचा वाढता ताण, अपुरी झोप यामुळे रक्तदाबावर परिणाम होत असतो. या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी या गोष्टी टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सोबत व्यायाम गरजेचा आहे. उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देऊन त्यांना रक्तदाबाची मोजणी नियमितपणे करण्यासाठी प्रवृत्त करावे, या उद्देशाने 'जागतिक उच्च रक्तदाब दिन' साजरा करीत असते. असे असताना उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भंडारा जिल्ह्यात २०१२-१३ मध्ये १० हजार ९५२, २०१३-१४ मध्ये १५ हजार ७७१, तर २०१४-१५ मध्ये १४ हजार ६६० रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक हजार १६४ रुग्णांमध्ये घट झाली आहे तर सन २०१२-१३ च्या तुलनेत सन २०१४-१५ मध्ये तीन हजार ६५५ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक आढळून आले. (नगर प्रतिनिधी)उच्च रक्तदाब म्हणजे काय?आपल्या रक्तवाहिन्यामधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. सर्वसाधारणपणे रक्तदाब दिवसभरात कमी-जास्त होत असतो. परंतु काहीजणांसाठी तो नेहमीच उच्च असतो. अशा लोकांना उच्च रक्तदाब पीडित संबोधले जाते. उच्च रक्तदाबामुळे हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणामकारक प्रभावाचा संभव असतो. यामुळे हृदयक्रिया बंद पडणे, डोळ्यांचे आजार, हृदयरोग होण्याचा संभव असतो.रक्तदाब असल्याची लक्षणे दिसून आल्यास त्यांनी नजिकच्या रुग्णालयात जावून तपासणी करावी. उच्च रक्तदाब असल्यास औषधांचे नियमित सेवन करावे. यावर नियमित व्यायाम हा उपाय असून तसे करता येत नसेल तर किमान अर्धा तास दररोज चालावे. - आर. डब्ल्यू. कामडे,कार्यक्रम अधिकारी, असंसर्गजन्य आजार सामान्य रुग्णालय भंडारा.
रुग्णालय तपासणीत उच्च रक्तदाबाचे आढळले १४,६०७ रुग्ण
By admin | Updated: May 14, 2015 00:33 IST