दिघोरी (मोठी) : लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न पाहत होती. त्यानंतर तिला मुलगी झाली. परंतु, नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक अवघ्या दोन वर्षात आजाराने पतीचे निधन झाले. त्यानंतर मोलमजुरी करुन सासरीच ती वेगळी राहत होती. अशातच तिच्या चुलत दिराने लग्नासाठी गळ घातली. सामाजिक बांधिलकी जोपासत तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन हनुमान मंदिरात त्यांचे लग्न लावून दिले. दिघोरी येथील दामोधर देवाजी देशमुख यांच्याशी अड्याळ चिखली येथील सुनंदा हिचे ७ आॅक्टोबर २००८ रोजी विवाह झाला होता. त्यानंतर हे दाम्प्त्य दिघोरीतच वेगळे राहत होते. २०१० मध्ये दामोधरचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर सुनंदा सासरी वेगळी राहत होती. नात्यात चुलत दीर असलेल्या गणेश दौलत देशमुख याने तिला लग्नाची गळ घातली. परंतु त्यांच्या लग्नाला गणेशच्या घरून विरोध होता. त्याने घरच्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. अखेर गणेशने तंटामुक्त गाव समितीपुढे आपली ईच्छा बोलून दाखविली. त्यानंतर तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन त्यांचे लग्न लावून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. त्यांच्या या पुढाकाराने सुनंदाच्या मुलीला बाप मिळाला आणि तिला पतीही मिळाला. वयाने मोठी आणि विधवा असतानाही गणेशने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष वसंत हटवार, बबन चेटूले, विनोद चौधरी, माधो कटारे, नरेश राऊत, बाबुराव धकाते, वासुदेव नेवारे, शारदा चिमनकर, मारोती जांभुळकर, प्रशांत करंजेकार, चेतन देशमुख, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
विधवेशी लग्न करुन ‘त्याने’ दिला सामाजिकतेचा परिचय
By admin | Updated: July 12, 2014 00:49 IST