करडी (पालोरा) : करडी येथे दोन महिन्यापासून ग्रामसेवक व कृषी सहायकाचे पद रिक्त आहे. वारंवार मागणी होऊनही पदभरती झालेली नाही. यामुळे वारंवार नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. दि. १५ आॅगस्ट रोजी ग्रामसेवकाअभावी ग्रामसभा तहकूब करावी लागली. गावकऱ्यांना ग्रामविकासाचे नियोजन करता आले नसल्याने त्वरित पदभरती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे यांनी दिली आहे. करडी येथे ग्रामसेवक नसल्याने ग्रामविकासात अडथळे निर्माण झाले आहेत. वेळोवेळी ग्रामसभा घेतल्या जात नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मासिक बैठकी होत नाही. ग्रामपंचायतच्या आर्थिक देवाण घेवाणसुद्धा अडचणीत आलेल्या आहेत. ग्रामविकासाचे नियोजन शासनाला वेळेवर पाठविता येत नाही. नागरिकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नाही. गावाच्या विकासाला हातभार लागण्याऐवजी विकसकामांना खीळ बसली आहे.करडी पाच हजार लोकसंख्येचे गाव असून व्यापारी केंद्र आहे. परिसरातील अनेक गावांचा संपर्क येथे असतो. शेतीसंबंधी अनेक प्रश्न वेळेवर सुटत नाही. गावात कृषी सहाय्यकाचे पदसुद्धा रिक्त आहे. सध्या खरीप हंगाम सुरु असून धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कृषीसंबंधी मार्गदर्शक असलेला कृषी सहायक गावात नसल्याने नागरिकांना वेळेवर मार्गदर्शन व मदत मिळत नाही. विभागाच्या अनेक योजनांपासून शेतकऱ्यांना वारंवार वंचित राहावे लागते.गावात रिक्त असलेले ग्रामसेवक व कृषी सहायकाचे पद भरण्याची मागणी वरिष्ठांकडे अनेकदा करण्यात आली. परंतु प्रत्येक वेळी डोळेझाक केली जाते. प्रभारी कर्मचाऱ्यांच् या भरवशावर येथील कामकाज चालविले जात आहे. प्रभारी कर्मचाऱ्यांना त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळेवर नागरिकांच्या समस्या सोडविण्यास ते असमर्थ ठरत आहेत. मात्र अधिकाऱ्यांना त्याचे काही एक वाटत नाही. पालोरा येथेसुद्धा कृषी सहाय्यकाचे पद रिक्त आहे. येथील कारभारही प्रभारावर आहे. एकंदर परिसरात समस्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत. ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांचे पद स्थायी स्वरुपात भरले जावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे व गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
ग्रामसेवक, कृषी सहायकाचे पद रिक्त
By admin | Updated: August 17, 2014 23:00 IST