तुमसर : सिंदपुरी येथील पूरग्रस्तांनी घरकुलासह अन्य मूलभूत सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात या मागणीकरिता आमसभेदरम्यान काही पूरग्रस्तांनी शासनाची मदत नाकारली. दरम्यान, या आमसभेत पूरग्रस्त संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. २२ जुलै रोजी तुमसर तालुक्यातील सिंदपुरी गावाजवळील माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटून सिंदपुरी गावात पाणी शिरले होते. या पाण्यामुळे गावातील ६८ घरे पुर्णत: पडली होती. उर्वरीत शंभरावर घरांना तडे गेले आहेत. सध्या पूरग्रस्त कुटुंब गावातील हनुमान मंदिर, विष्णू मंदिर व समाजभवनात आश्रयाला आहेत. शासनाने १०४ कुटुंबाला २ लाख ९७ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. काहींनी ही मदत नाकारली. तुटपूंजी मदत घेऊन काय करणार असा प्रश्न करुन आम्हाला घरकुल तयार करून द्या, अशी मागणी या पूरग्रस्तांनी करुन ४५ कुटुंबांनी मदत नाकारली. मॉईल प्रशासन २५ शेड तयार करून देणार आहे. यात सर्वच पूरग्रस्तांचा समावेश होणार नाही. मॉईलने १२० टीन व ३ मेट्रीक टन लोखंडी खांब दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत टीन शेड उभारणी करण्यात येत आहे. येथे तलावाची मालकी कुणाकडे राहील याचा निर्णय अजूनपर्यंत झाला नाही. ग्रामसभेत शासनाकडे हस्तांतरणाचा ठराव घ्यावा, अशा सूचना येथे तहसील प्रशासनाने दिले आहेत. एका महिन्याच्या कालावधी येथे लोटला तरी शासनाने अजूनपर्यंत ठोस मदत देण्यात आलेली नाही. पूरग्रस्तांना १०० रुपये खावटी व मुलांना ४० रुपये आर्थिक तुटपुंजी मदत दिली आहे. या पूरग्रस्तांच्या व्यथा कायम आहेत. परंतु त्यांच्याकडे बघणारे त्यांचे अश्रु पुसणारे कुणी दाता त्यांना सापडलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. परिणामी पूरग्रस्तांना घरे बांधून देणे व मागण्या पूर्ण करून देण्याची मागणी पूरग्रस्तांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सिंदपुरी येथील पूरग्रस्तांनी नाकारली शासकीय मदत
By admin | Updated: August 20, 2014 23:20 IST