भंडारा : गोसे प्रकल्पग्रस्तांना सरसकट अनुदान देण्यात यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्त संवर्धन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यात हरितक्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने बांधण्यात आलेला गोसेखुर्द प्रकल्प शासनाने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केला असला तरी येथील प्रकल्पग्रस्तांसाठी हा प्रकल्प दिवसेंदिवस कर्दनकाळ ठरत आहे. अगोदरच शासनाने घराची व जमिनीची किंमत अत्यंत अल्प दिली असून ती सुद्धा टप्प्याटप्प्याने दिली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना ना शेती घेता आली ना घर बांधता आले. तसेच मिळालेल्या पैशावर संबंधित नातेवाईकांनी हक्क दाखविल्यामुळे कुणाला नाहकच न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कुणीतरी कायम स्वरुपी नातेवाईकांना मुकले असून आधीच रस्त्यावर आलेले प्रकल्पग्रस्त आता मानसिक तणावाखाली वावरताना दिसत आहेत. हातची शेती गेल्यामुळे कुटुंबाचे आता पालन पोषण कसे करावे, या चिंतेपोटी कुणी तर व्यसनाधीन झालेले आहेत. नुकतेच सावरगाव या गावी दोन प्रकल्पग्रस्तांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. शासनाने नुकतेच १२०० कोटीचे पुनर्वसन पॅकेज देणे सुरु केले पण त्यातही जाचक अटी लावल्यामुळे खऱ्या प्रकल्पग्रस्तांना याचा काहीच लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक गावस्तरावर चर्चा नव्याने घडवून आणावी, मिळणाऱ्या १२०० कोटींच्या पॅकेजमध्ये ज्यांची नुसती जमीनच गेली अशाही प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावे, जी कुटुंबे काही कारणास्तव त्याच गावात किरायाने कायमस्वरुपी राहत होती अशाही बाधीत कुटुंबांना सामावून घ्यावे, ज्याची पुनर्वसीत गावठाणासाठी जमीन हस्तांतरण करण्यात आली अशाही प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी इंदिरा सागर प्रकल्पग्रस्त संवर्धन संघटनेचे संघटक लंकेश्वर कांबळे व पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)
गोसे प्रकल्पग्रस्तांना सरसकट अनुदान द्या
By admin | Updated: September 22, 2014 23:14 IST