कुंदावार यांचे प्रतिपादन : शौचालयाबाबत रोजगार सेवकांना प्रशिक्षणभंडारा : ज्यांचे आरोग्य सुदृढ राहील त्यांचे शरीर चांगले राहील आणि शरीर चांगले ठेवायचे असेल तर गाव, घर, परिसर स्वच्छ, सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाणी घणकचरा व्यवस्थापन यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे. तरच सर्वगुण संपन्न होवून गाव विकासाला दिशा देता येईल, असे प्रतिपादन साधन व्यक्ती कुंदावार यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने जि.प. च्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित रोजगार सेवक प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. भंडारा मंजुषा ठवकर, मार्गदर्शक साधन व्यक्ती कुंदावार, रविंद्रजावळे, सहाय्यक खंडविकास अधिकारी करंज़ेकर, विस्तार अधिकारी जे.डब्लू. राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली.कुंदावार पुढे म्हणाले, गाव घर परिसर स्वच्छ असावे. पूर्ण क्षेत्रात हद्दीत कुठेही घाण नको. कारण घाणीमुळे चाळीस टक्के शरीराचे आजार होतात. अशुद्ध पाणी शरीराला मिळाले तर त्यातून चाळीस टक्के आजार होतात. तर वीस टक्के आजार अज्ञानामुळे वाढतात. ही परिस्थिती येण्यापूर्वीच प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्याकरिता घर तिथे शौचालयाचे बांधकाम करून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) मंजुषा ठवकर यांनी शौचालयाचे बांधकाम करण्यापूर्वीची प्रशासकीय कार्यवाही, त्यासाठी मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान, महात्मा गांधी रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियान, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करण्यात येणारे शौचलयाचे बांधकाम, ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर रोजगार सेवकांना करावी लागणारी कामाची पद्धती, त्यांना निर्माण होणाऱ्या अडी अडचणींचे निराकरण यावेळी केले. साधन व्यक्ती रविंद्र जावळे यांनी वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम, तांत्रिक बाबी, जागेची निवड, बांधकामाची पद्धती, अंदाजपत्रकानुसार येणारा अंदाजे खर्च, शौचालयाची गरज का? याबाबत मुद्देनिहाय रोजगार सेवकांना माहिती दिली. प्रास्ताविक करताना डी.एम. बिसेन यांनी वैयक्तिक शौचालयाचे बांधकामाचे लाभार्थी, ग्रामपंचायतस्तरावर, रोजगार सेवकांची भूमिका, जबाबदारी, प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी करताना रोजगार सेवकांचे कार्य व कार्यक्रम राबविण्यासाठी सहभागी घटकांचा पुढाकार याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे यांनी तर आभार मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा अंगणवाडी तज्ज्ञ उषा वाडीभस्मे, मुल्यमापन व संनियंत्रण तज्ज्ञ सरोज वासनिक, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ, निलीमा जवादे, सुशांत ढोके, बबन येरणे, प्राशंत फाये, भूषण मुळे, देवेंद्र खांडेकर यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
गावविकासाला दिशा देण्यासाठी सर्वगुण संपन्न व्हा
By admin | Updated: July 28, 2014 23:22 IST