लाखनी : राज्य शासनाने विज्ञान शाखेच्या इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता ३५ टक्के गुण असणाऱ्यांनाही प्रवेश देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला तुकडीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची कास धरली आहे. यामुळे कला शाखेच्या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याचे संकेत आहे. त्यामुळे कला शाखेचे भवितव्य अधांतरी दिसत आहे.१० वीच्या परीक्षेत ३५ टक्के गुण प्राप्त करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ वीच्या विज्ञान शाखेला प्रवेश देण्याचे परिपत्रक निघाले आहेत. यापुर्वी विज्ञान शाखेकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुणांची अट होती. मात्र नवीन अध्यादेशामुळे ती अट शिथिल होवून ३५ टक्क्यापर्यंत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, विज्ञान शाखेचा विद्यार्थी व्हावा हाच या मागचा उद्देश आहे. शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थी व पालकांमध्ये झुंबड उडते. तर मराठी माध्यमाच्या कला शाखेकडेही असाच ओढा ग्रामीण भागात दिसून येतो. शासनाने शहरीभागात विनाअनुदानित तत्वावर तुकड्या सुरू केल्या आहेत. विज्ञान शाखा व क्षमतेबाहेर विद्यार्थी संख्या होत असल्यामुळे काही निवासी शिकवणीवर्ग सुरू करून विनाअनुदानित विज्ञान शाखेत प्रवेश दाखविला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची शहरी भागाकडे व तालुका स्तरावर शिकण्याची इच्छा वाढत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांअभावी 'कला' शाखेचे भवितव्य अधांतरी
By admin | Updated: July 29, 2014 23:39 IST