बारव्हा : राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारे उघडी केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढली आहे. मात्र महत्वाच्या पदावर महिला आरुढ असताना सुद्धा पतीदेवच कारभारी असल्याचे दिसून येते. महिला सरपंच पदावर असल्याने त्यांचे पतीदेव अर्थपूर्ण काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २१ आॅक्टोबर २०१२ मध्ये झाल्या. संबंध तालुक्यात ५१ सरपंच पदापैकी थेट २७ महिला सरपंच विविध प्रवर्गांतर्गत राखीव करण्यात आले. त्यामध्ये नामाप्र (महिलासाठी) ०८, अनु. जाती साठी (महिला) ०६, सर्वसाधारण (महिला) १२ व अनु. जमाती महिला १ अशी २७ सरपंचाची पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. महिलांचा सामाजिक राजकीय आणि सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षापासून महिलांसाठी विविध योजनांची आखणी शासनाने केली आहे. महिला सक्षमीकरणाचे मुद्दे असो की त्यांचे बचत गट असो. महिलांना पुरुषांच् या बरोबरीने आणण्यासाठी शासन सातत्याने पुढाकार घेत आहे.महिलांनी राजकीय क्षेत्रातील सत्तेची चावी आपल्या हातात घेतली पाहिजे. परंतु महिलांच्या अज्ञानामुळे किंवा जोखीम न स्वीकारण्याच्या संकुचित प्रवृत्तीमुळे अनेक महिला नवऱ्यांच्याच हाती सत्तेची चावी देतात आणि स्वत:ला पूर्ण अधिकार असूनही अगदी कठपुतळीप्रमाणे त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात. नाही तर त्यांना शिविगाळ करून मारहाण केल्याचेही किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे नवरा म्हणेल तेच महिला सरपंचाला करावे लागत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकार उजेडात आले. अशा अशिक्षित महिला सरपंचांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. कारण जिथे आयुष्यभर चुल आणि मुल हे सूत्र स्वीकारून संसार केला त्या बाईला राजकारण काय कळणार? याचा अर्थ असा होतो की ती केवळ नामधारी सरपंच राहते. ग्रामपंचायतचा कारभार करणारे खरे कारभारी हे दुसरेच असतात. म्हणजे इथेही पुरुषप्रधान संस्कृतीच अप्रत्यक्षपणे सत्ता भोगत असते, हे नाकारता येत नाही. त्यामुळे राजकारणात महिलांना संधी देऊनही त्यांचे पतीच कारभार हाकत असतील तर महिलांना स्वातंत्र्य मिळाले काय?
महिला सरपंच नामधारी, नवरेच खरे सत्ताधारी
By admin | Updated: July 12, 2014 23:29 IST