लाखनी : महाराष्ट्रात भंडारा जिल्हा मागासलेला अशी ओळख आहे. प्रतिमा पुसून काढायची आहे. त्यासाठी आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी कटीबद्ध आहे. सामान्य कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांचे, गरीबांचे दु:ख माहित आहे. वंचितांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठी आपण राजकारणात आलेलो असून विकासाचे राजकारण करीत आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे गुरे बाजाराच्या आधुनिकीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती शिवराम गिऱ्हेपुंजे होते. अतिथी म्हणून खरेदी विक्रीचे अध्यक्ष घनश्याम खेडीकर, पंचायत समिती सभापती सूर्यभान सिंगनजुडे, सभापती नारायण वरठे, तालुका कृषी अधिकारी कोडाली, जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे, सरपंच उर्मिला आगाशे उपस्थित होते.प्रास्ताविक उपसभापती केशवराव मांडवटकर यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीच्यावतीने खा.पटोले यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय बाजार समितीमध्ये शेळी-मेंढी बाजार, केंद्रीय गोदामाचे उद्घाटन आणि जनावरे बाजार आधुनिकीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी शिवराम गिऱ्हेपुंजे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. बाजार समितीद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करून शेतमालाला योग्य भाग देण्याची मागणी केली. घनश्याम खेडीकर यांनी शेतकऱ्यांचे उन्हाळी धानाचे चुकारे मिळण्याची मागणी केली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.संचालन अंगराज समरीत यांनी तर आभार प्रदर्शन पद्माकर बावनकर यांनी केले. यावेळी ज्योती निखाडे, रसिका कांबळे, बबलू निंबेकर, रुपलता जांभुळकर, विनायक बुरडे, रविंद्र बिसेन, भागवत नागलवाडे, सुरेश कापगते, चंद्रशेखर टिचकुले, दिगांबर सेंदूरकर, सुगंधा बांगडकर, मंदा नान्होकर, अनिल खोटेले, खिरोज गायधनी, रणबीर भगत, ताराचंद निरगुळे, लिलाधर चेटुले, धनू व्यास उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
लाखनी बाजार समितीत शेतकरी मेळावा
By admin | Updated: August 18, 2014 23:20 IST