पवनी : पवनी व लाखांदूर तालुक्यात वलीत व कोरडवाहू प्रकारची जमीन आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी निजीविडू सिड्स कंपनीचे १२० दिवसात उत्पन्न देणारे हलके धानाचे बियाणे खरेदी केले. परंतू कंपनीच्या चुकीच्या प्रसारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. कोंढा येथील उत्तम टेंभूर्णे, सुरेश बावनकर, पेंढरी येथील श्रीपत शिवणकर, मोतिलाल हुमणे, अमृत शिवणकर, प्रकाश शिवणकर, भागवत शिवणकर तसेच पालेपेंढरी, कोदूर्ली, सोनेगाव, मासळ बेलाटी, पाचगाव, खैरीपट, खैरी मासळ, सोनी या गावातील ३६ शेतकऱ्यांनी निजीविडू सिड्स कंपनीचे सुमा व श्री वाण १२० दिवसात उत्पन्न देणारे असल्याने लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील लक्ष्मी कृषी केंद्रातून धानाचे बियाणे खरेदी केले. यावेळी त्यांना १२० दिवसात उत्पन्न होणारे धानाचे बियाणे असल्याचे सांगण्यात आले तसेच काहींच्या बिलावर तसा उल्लेख केला. परंतू त्या वाणाचे उत्पादन १२० दिवसाऐवजी १४० ते १५० दिवसात झाले. २० ते ३० दिवस अतिरिक्त लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.याची तक्रार जिल्हा कृषी अधिक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करण्यात आली. बियाण्याचे बैगवर असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. जिल्हाधिकारी शेतकऱ्यांची समस्या समजून घेवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)बोगस बियाणे तयार करणारी टोळीपवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचे धानाचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे काही बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी चौरास भागातील काही धान्य व्यापाऱ्यांना खरेदी एजंट बनविले आहे. ते व्यापारी एजंटला क्विंटलमागे १,५०० रूपये ते १,८०० भाव देवून शेतकऱ्यांकडून धान खरेदी करीत आहेत. खरेदी केलेले धान कंपन्यांना २,५०० ते ३,००० रूपये भावाने विक्री करीत आहेत. सदर कंपन्या हे धान त्यांच्या लेबल असलेल्या बँगेत प्रक्रिया न करता भरून ४,५०० ते ५,००० रूपयाप्रमाणे बियाणे म्हणून उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे वरचेवर मोठी रक्कम कमविण्याचे नादात शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले जात आहे. परिणामी पेरलेल्या बियाण्यापासून फारशे उत्पन्न मिळत नाही. उत्पादन खर्चात मात्र दरवर्षीला वाढ होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. बोगस बियाणे निर्मिती थांबविण्यासाठी कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Updated: November 24, 2015 00:38 IST