भंडारा: लिलाव झालेल्या नदीघाटांची मुदत संपूनही अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरूच आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळूमाफियांचा गोरखधंदा सुरू आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी अधिकाऱ्यांना वाळूतस्करी रोखण्याचे निर्देश दिले. सुरक्षेच्या कारणावरून कर्मचारी संघटनेने कारवाई करण्यास असमर्थता दर्शविल्याने वाळूमाफियांना रान मोकळे झाले आहे.पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर महसूल विभागाने वाळू उपसासाठी नदीघाटांची लिलाव प्रक्रिया पार पाडली. वाळू उपशास मुदत देण्यात आली होती. परंतु, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळूमाफियांकडून अवैधरीत्या उपसा करून वाळूची वाहतूक केली जात आहे. रात्रीच्या सुमारास वाळूंच्या ट्रकची रीघच लागलेली असते. पोलिस प्रशासनाकडून चिरीमिरी घेऊन वाळूंच्या ट्रकवर कारवाई केली जात नाही. यामुळे वाळूमाफियांचा मनोधैर्य वाढले आहे. दररोज हजारो टन वाळूची चोरटी वाहतूक होत असतांना महसूल विभागाचे अधिकारी केवळ डोळेझाक करीत आहे. काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठकीत वाळूमाफियांवर कारवाई करणारे कर्मचारी टार्गेट बनत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहे. वाळूमाफियांनी गावागावांत वाळूचा साठा केला आहे. वाहतुकीचा परवाना नसतानाही साठवलेल्या वाळूची वाहतूक करीत आहे.(नगर प्रतिनिधी)
मुदत संपूनही वाळूचा उपसा सुरू च
By admin | Updated: November 1, 2014 22:48 IST