दोघांची प्रकृती खालावली : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली चर्चा वरठी : १ सप्टेंबरपासून वरठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. शुक्रवारला दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व खंड विकास अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली. या भेटीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा आढावा घेऊन मागण्या पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगितले. परंतु उपोषणकर्ते व संघटनांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुर्तास तरी उपोषण सुटण्याची शक्यता मावळली आहे.वरठी ग्रामपंचायतमध्ये ३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यात २३ कर्मचारी स्थायी आहेत. शासनाच्या आकृतीबंधानुसार एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारावर खर्च करता येते. त्यानुसार या ग्रामपंचायतीत आकृतीबंधानुसार ६ कर्मचारी नियुक्त करण्याचा नियम आहे. परंतु वेळोवेळी बदललेल्या सरपंचांनी सोयीनुसार २३ कर्मचाऱ्यांना स्थायी केले. सद्यस्थितीत चार कर्मचाऱ्यांना आकृतीबंधानुसार किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात येत आहे. उर्वरित दोन कर्मचाऱ्यांचे प्रस्तावर सुधारित वेतनश्रेणीकरिता प्रस्तावित आहे. त्यानुसार उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी १९ आॅगस्टपासून साखळी उपोषण सुरु केले होते. १२ दिवस साखळी उपोषण करुनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे १ सप्टेंबरपासून १३ कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले. याचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात जावून आढावा घेतला. ग्रामपंचायतच्या सर्व स्त्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ७० टक्केच्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होताना आढळून आले. त्यामुळे ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी खंडविकास अधिकारी पंकज भोयर, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलिंद रामटेके, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरकर, शाखोद डाकरे, सुनिता बोंदरे, संगिता सुखानी, ग्राम विकास अधिकारी भाष्कर डोमळे व उपोषणकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)उपोषणकर्ते रुग्णालयातग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी १ कर्मचाऱ्याच्या छातीत दुखत होते. परंतु त्यांनी भरती होण्यासाठी नकार दिला. चौथ्या दिवशी मोतीलाल गजभिये, मुन्ना वांद्रे यांना प्राथमिक तपासणीकरीता वरठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले,-तर करात दुपटीने वाढ होणार?ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतला उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागतील. ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न ३४ लाख रुपये आहे. हे उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण होणे शक्य नाही. यासाठी गृहकर, पाणी पट्टीकर, दिवाबत्ती कर यासह सर्वच कर आणि ग्रामपंचायतला उत्पन्न देणारे सर्व स्त्रोतातील आवक दुप्पट करावी लागेल. तेव्हाच या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा तिढा सुटेना
By admin | Updated: September 5, 2015 00:38 IST