गोसे (बुज.) : गोसेखुर्द धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, येथील ग्रामस्थांनी त्यांचे साहित्य जुन्याच गावात ठेवले आहे. धरण प्रशासनाने पाणी सोडल्याने ते गावात शिरले. त्यामुळे ग्रामस्थांना याचा फटका बसला. ग्रामस्थांचे नुकसान होऊ नये म्हणून गोसे प्रकल्प कार्यालयाने गावकऱ्यांना सहा दिवसांचा अवधी दिला आहे. यादरम्यान पाणी सोडणे स्थिर राहणार आहे. गोसेचे पाणी धान पिकासाठी नवसंजीवनी ठरली आहे.या कालव्यातील पाणी चौरास पर्यंत जावून पोहचले आहे. धरणातील २४१ मीटरवर गेल्यावर वाहत्या पाण्याला वेग येणार आहे. शनिवारी धरणातील पाण्याचा जलस्तर २३९.६०० मीटर होता. प्रकल्पग्रस्तांना आपल्या जुन्या गावातून घराचे साहित्य काढून नवीन गावठाणात स्थानांतरण करण्याकरिता आज धरणाचा जलस्तर २३९.६०० मीटरवर स्थिर ठेवून जलस्तर वाढविण्याचे तात्पुरते थांबविलेले आहे. दुपारी ३ नंतर धरणाचे २ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे. पण २५ तारखेच्या नंतर धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम परत सुरू केल्या जाणार आहे.पुरेशा पाऊस न आल्यामुळे धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर होते. शेतजमिनीला भेगा पडणे सुरू झाले होते.गोसीखुर्द परिसरासोबतच चौरास भागातील शेतकऱ्यांनीही धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली. डावा कालवा विभागाने पाणी सोडले. दोन दिवसापासून पाथरी गावाजवळच्या डाव्या कालव्याचे दोन्ही दारे उघडण्यात आली आहेत. या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी आहे. पण धरणाचा जलस्तर २४१.०० मिटरवर पोहचल्यावर कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याला गती येणार आहे. २४१.०० मिटरवरच नेरला उपसा सिंचन योजना सुरू होणार असल्यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीला सिंचन होणार आहे. डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा फायदा गोसेबुज, आकोट, चिचाळ, कोंढा, कोसरा, सोमनाळा, सेंद्रीखुर्द, सेंद्रीबुज, रनाळा, भावड, खैरी, नवेगाव, मांगली आदी गावातील हजारो हेक्टर शेतजमिनीला झाला आहे. यावर्षी पाऊस बरोबर झाला नसल्यामुळे शेतकऱ्याच्या धान पिकाचे नुकसान होत होते. पण गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हजारो हेक्टर धान पिकाला नवसंजिवणी मिळाली आहे. (वार्ताहर)
गोसीखुर्दमुळे हजारो हेक्टर धानाला 'नवसंजीवनी'
By admin | Updated: September 20, 2014 23:43 IST