भंडारा : जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यानंतरही वारंवार या घटना घडत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अशा सोशल मीडियावरील आमिषाला बळी पडू नका असे आवाहन केले. फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
सोशल मीडिया साईडवर फेक अकाउंट तयार केले जाते. काही इसम प्रोफाईलचा वापर करून मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. आलेली रिक्वेस्ट ओळखीच्या व्यक्तीची असल्याने ती स्वीकारली जाते. त्यानंतर कोणत्यातरी भावनिक कारणावरून पैशाची मागणी केली जाते किंवा केवायसी अपडेट करण्याचे कारण देऊन पैशाची मागणी केली जाते. अनेकदा एटीएम कार्ड ब्लाॅक झाल्याचे सांगूनही ओटीपी प्राप्त करून खात्यातून परस्पर पैसे काढले जातात. हा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. मात्र आता अशी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.