ठाणेदार सय्यद यांचा पुढाकार : ढिवरवाडा येथील प्रकरणपालांदूर : गावकऱ्यांनी काही वर्षापूर्वी पांदण रस्त्याला शेतजमिनी दिल्या. मात्र काम सुरु झाल्यानंतर यातील काहींनी त्याला विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. हा प्रकार लगतच्या ढिवरखेडा येथे घडला. मात्र पालांदूरचे ठाणेदार सय्यद यांनी हा वाद सामाजिक सलोख्याने मिटवून पांदण रस्त्याच्या उर्वरित कामाला सुरुवात झाली आहे. शासनाने गावाच्या विकासासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. यात गावातील अंतर्गत रस्त्यांसह नाली बांधकाम, विद्युतीकरण यासह पांदन रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येतो. शेत शिवाराकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात पांदण रस्ता संबोधल्या जाते. ढिवरखेडा येथील पांदण रस्ता सुमारे २५ वर्षांपासून दुर्लक्षीत आहे. यामुळे ग्रामस्थांना शेतावर जाताना अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, ग्रामस्थांनी पांदण रस्ता व्हावा यासाठी त्यांच्या शेतीतील काही भाग रस्त्यासाठी दिला. त्यानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून १३०० मीटर रस्त्याच्या कामाकरिता १३ लक्ष रुपये अकुशल कामातून प्रस्तावित करण्यात आले. या रस्त्याचे सुमारे १२०० मीटर काम सुरळीत करण्यात आले. मात्र केवळ ५० मीटर कामाकरिता लगतच्या शेतकऱ्यांनी विरोध केला.यामुळे सदर पांदण रस्त्याचे काम रखडण्यात आले. या रस्त्याच्या कामावरुन गावातील सामाजिक सलोखा दुरावण्याचे चिन्ह निर्माण झाले. याची माहिती पालांदूरचे ठाणेदार सय्यद यांना होताच त्यांनी दोन्ही गटातील नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी पोलीस मित्र व दोन्ही गटातील नागरिकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावरुन दोन्ही गटाने रस्त्याचा विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. ठाणेदारांच्या पुढाकाराने या रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरु आहे. यासाठी सरपंच गजानन शिवणकर, पोलीस मित्र विलास शेंडे, जयंत फुल्लुके, पीतांबर फुल्लुके, रामा दहिवले, आनंद हत्तीमारे, शालिक शिवणकर, देवराम शिवणकर, युवराज शहारे, शाधु शिवणकर, सुनील थेर यांनी महत्त्वाची भूमिका निभविली. (वार्ताहर)ठाणेदारांचा पौराणिक संदेशपोलीस म्हटले की सर्वांच्या नजरेत भरतो रुबाबदार व्यक्ती, हातात काठी घेतलेला पोलीस. मात्र खाकी वर्दीतही सामाजिक दायित्व सांभाळणारा एक जबाबदार नागरिक असतो. याची प्रचिती पांदन रस्त्याच्या बाबतीत ठाणेदारांच्या मध्यस्थीतून दिसून आली. दोन्ही गटाच्या नागरिकांना कायद्याची माहिती दिली. एवढ्यावरच न थांबता रामयण व महाभारतातील उदाहरणांचा उल्लेख करीत पौराणिक कथातून त्यांनी नागरिकांना दिलेल्या संदेशातून दोन्ही गटाने सामोपचाराने मार्गाचा तिढा सोडविला.
पांदण रस्त्याचा वाद मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2016 00:46 IST