पाच जणांना अटक व सुटका : कोका अभयारण्यातील घटनाकरडी (पालोरा) : अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात गुरे चराईची बंदी असतानाही नियमाचे उल्लंघन करुनही उसगाव येथील पाच जणांनी वनरक्षकांवर हल्ला चढवून काठीने मारहाण केली. ही घटना दि. २३ जून रोजी कोका अभयारण्यात घडली.या प्रकरणी साकोली पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. जयप्रकाश येळेकर (३०), मुनेश पटले (२२), ओमप्रकाश येळेकर (२४), अविनाश रामटेके (२१) आणि माधोराव येळेकर (६६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत असे की, वनरक्षक सुनीलकुमार गौतम, सी.पी. पारधी, अंबुले, के.जी. फाये व वनमजूर हे दि. २३ रोजी सकाळी अभयारण्यात गस्तीवर होते. गस्ती आटोपून ९.३० वाजताच्या सुमारास सोनेगाव येथील निवासस्थानी आले. विश्रांती करीत असताना वनरक्षक चांदेवार यांनी बीट क्रमांक १०७ मध्ये गुरे चरत असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे सर्व वनरक्षकांनी बिटाकडे धाव घेतली. जनावरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जयप्रकाश येळेकर याने काठीने हातवारे करुन गुरांना पळविले. वनरक्षकांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. वनरक्षकांनी जयप्रकाश येळेकरला ताब्यात घेतले. त्याला सोनेगाव येथील निवासस्थानी वनरक्षकांनी आणले. त्यावेळी जयप्रकाशने भाऊ, वडील व गावातील नागरिकांना बोलावून घेतले. त्यानंतर जमावातील पाच जणांनी वनरक्षकांवर हल्ला चढविला. काठीने मारहाण केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनरक्षकांनी सदर माहिती वरिष्ठांना दिली. वनरक्षक सुनील गौतम याने घटनेची तक्रार साकोली पोलिसात नोंदविली. तक्रारीवरुन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४९, ३५३, ३३२, १८६ कलमान्वये गुन्हे नोंदविले. घटनेचा अधिक तपास साकोली पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
वन रक्षकांवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: June 25, 2014 00:13 IST