भंडारा : कोरोनावर लसीकरण हेच एकमेव रामबाण उपाय आहे. १८ वर्षे ते त्यापुढील वयोगटांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र गर्भवती व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींसाठी तसेच बालकांसाठी लसीकरण आतापर्यंत झालेले नाही; मात्र राज्य शासनाच्या निर्देशानंतर आता गर्भवतींसाठी ही कोविड लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. गर्भवती महिलांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले असून लवकरच लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यात २१ जूनपासून पुन्हा लसीकरण मोहीम हातात घेण्यात आली. त्या अंतर्गत आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली आहे. परंतु गर्भवती महिला यापासून सुटल्या होत्या. गर्भवतींना लस द्यायची किंवा नाही यासाठी विविध चाचण्या व तपासणी सुरू होती; मात्र आता गर्भवतींसाठी ही लसीकरण करण्यात येणार आहे. यात सर्वात प्रथम भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय, साकोली व तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्भवतींसाठी लसीकरण मोहीम लवकरच राबविली जाणार असल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोट बॉक्स
जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण
कोविड १९ अंतर्गत लसीकरण हे गर्भवती महिला व तिच्या बालकासाठी अत्यंत उत्तम फायद्याचे आहे. . या लसीकरण मोहीम अंतर्गत भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयासह साकोली व तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यात येणार आहेत. जे आरोग्य कर्मचारी गर्भवतींना लसीकरण करतील ते आधी सर्वात प्रथम गर्भवती महिलांना मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत. कोविड १९ गर्भवती महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कोविड १९ चा संसर्ग झालेल्या बहुतांश महिलांना रुग्णालयात दाखल होण्याची कोणतीही आवश्यकता भासत नसली तरी काही महिलांची प्रकृती वेगाने खालावत जाण्याची शक्यता असते. लक्षणे दिसून येणाऱ्या गर्भवती महिलांमध्ये आजाराची तीव्रता वाढण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो, असे तपासाअंती दिसून आले आहे. जर आजाराची तीव्रता वाढली तर इतर बाधितांना प्रमाणे गर्भवती महिलांना देखील रुग्णालयात दाखल केले पाहिजे. उच्च रक्तदाब, स्थूलता ३५ वर्षांपेक्षा अधिक वय यासारख्या वैद्यकीय अवस्था असलेल्या गर्भवती महिलांमध्ये कोविड १९ आजाराची तीव्रता वाढण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. तसेच संसर्गामुळे अकाली प्रसूत होणे, शिशूचे वजन कमी भरणे आदी समस्या उद्भवू शकतात. लसीकरण झाल्यास गर्भावस्थेत बाळाला संसर्ग होण्याचा धोका वाढत नाही. बहुतांश गर्भवती महिलांमध्ये लक्षणे दिसून येत नाही किंवा सामान्य स्वरूपाची लक्षणे दिसून येतात अशा महिलांनी लस घ्यावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे.
कोट बॉक्स
मला माझ्या जीवाची भीती नाही मात्र माझ्या गर्भात वाढत असलेल्या बाळाची मला चिंता आहे. त्याला कुठलाही धोका उत्पन्न होऊ नये, असे मला नेहमी वाटत असते. दिशा निर्देशानुसार गर्भवती महिलांसाठी लसीकरण होत असेल तर ती चांगली बाब आहे. मात्र यात अधिक स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे.
एक गर्भवती
कोट बॉक्स
कोविड १९ संसर्गाचा परिणाम बाळावर होता कामा नये. मी नेहमी आपल्या डॉक्टरच्या संपर्कात असते. लसीकरण घ्यायचे असल्यास त्या संबंधाने मी सल्ला घेणार आहे. लसीकरण कोठे व केव्हा होणार याचीही मी माहिती घेणार आहे. मात्र या लसीकरणातून कुठलाही धोका तर उत्पन्न होणार नाही याचीही मी काळजी घेईन.
एक गर्भवती
कोट बॉक्स
गर्भवती महिलांनी न घाबरता लस घ्यावी. गर्भवती महिलांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही कोविड १९ लसीकरण हे गर्भवती व तिच्या बालकासाठी अत्यंत फायद्याची बाब आहे. बाळाला संसर्गापासून वाचविण्यासाठी लस हे एक रामबाण औषध आहे.
-डॉ. माधुरी माथूरकर, जिल्हा लसीकरण अधिकारी. भंडारा