कोरोनाने जिल्ह्यातील अनेक परंपरा रोखण्याचाही प्रयत्न केला. यात्रा, उत्सव रद्द झाली. धार्मिक स्थळेही कुलूपबंद होती. परंतु माणसांनी आस्था सोडली नाही. आपल्या आराध्य दैवतावरचा विश्वास ढळू दिला नाही. लग्न सोहळ्यावर अनेक जण लाखोंचा खर्च करतात. त्यातून बडेजाव करण्याचा प्रयत्न होतो. मात्र कोरोना संकटात कितीही श्रीमंत असला तरी त्याला साधेपणातच लग्न करावे लागले. या सोहळ्यावर होणारी वारेमाप उधळपट्टीही थांबली. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा होवू शकतो, हे या शरत्या वर्षाने सर्वांना शिकविले. मरणदारी आणि तोरणदारी गेलेच पाहिजे, अशी परंपरा आहे. परंतु मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहचेनेही कोरोनाने कठीण झाले होते. अगदी जवळच्या २० आप्तसोकीयांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ कोरोना वर्षात आली. एकंदरीत सरत्या वर्षाने माणूस अंतरबाह्य बदलला असून या संकटातून धडा घेत तो आता मार्गक्रमण करणार आहे.
बॉक्स
कोरोनाने दिले नवीन शब्द
कोरोना संकटाने अनेक नवीन शब्द सर्वसामान्यांना माहित झाले. लॉकडाऊन हा शब्द तर प्रत्येकाच्या तोंडी दिसून येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लॉकडाऊन म्हणजे काय, याचा अनुभव घेतला. कंटेन्टमेंट, आरटीपीसीआर, ॲन्टीजेन, स्वॅब असे शब्द आता सर्वांच्या अंगवळणी पडले आहे.
बॉक्स
परतीच्या मजुरांना मदतीचा हात
कोरोना संकटामुळे महानगरातील हजारो मजूर पायदळ आपल्या गावाकडे निघाले होते. मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील शेकडो मजूर दररोज भंडारा शहरातून पायदळ जात होते. आबालवृद्ध आपले गाठोडे घेवून मोठ्या कष्टाने मजल दरमजल करीत होते. अनेकांजवळ तर पैसेही नव्हते. भूकेने व्याकूळ झालेल्या अनेकांना भंडारा शहराने आधार दिला. ठिकठिकाणी या काळात अन्नछत्र उघडून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शासनानेही सेल्टरहोम उघडून तेथे निवासाची व्यवस्था केली. झाडू विक्रीचा व्यवसाय करणारे २५ कुटुंब भंडारात अडकले हाेते. त्यांना प्रशासनाने मदतीचा हात देत महिनाभर सेल्टरहोममध्ये ठेवले. त्यानंतर खास वाहनाने त्यांना गावी पाठविले. अनेकांना या कोरोनाने संकटाच्या खाईत लोटले असेल तरी माणसातील देव या संकटात धावून आल्याचा प्रत्येय आला.