माडगी येथील प्रकार : जीवन प्राधिकरणाच्या पाच योजना बंदच, पाणीपुरवठा योजना ठप्प पडण्याची शक्यतातुमसर : जीवनदायीनी बारमाही वाहणारी वैनगंगा नदीचे माडगी येथे एका लहान तलावात रुपांतर झाले आहे. नदीची धार बंद झाली आहे. तुमसर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजना यामुळे ठप्प पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बावनथडी धरणातून पाणी सोडल्यावरही ते पाणी वैनगंगेपर्यंत पोहचले नाही. केवळ नाकाडोंगरी तथा बपेरा पर्यंतच पाणी पोहोचले हे विशेष.तुमसर तालुक्यात बारमाही वाहणारी वैनगंगेचा प्रवास किमान १०० कि.मी. चा आहे. उन्हाचा प्रकोप व रेकॉर्ड उष्णतामानात वैनगंगा नदी कोरडी पडली. प्रचंड पाण्याचा उपसा तथा रेती उत्खनन यामुळे नदी पात्रात रेती ऐवजी माती दिसत आहे. वाहणी - मांडवी येथे बॅरेज तयार करण्यात आले. अदानी वीज समूह व धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा हा संयुक्त उपक्रम आहे. पाणी अडविल्याने पुढे पाणी वाहने उन्हाळ्यात बंदच झाले. केवळ भंडारा शहर व परिसरातील नदीत पाणी उपलब्ध आहे. रेंगेपार ते रोहा - बेटाळा पर्यंत वैनगंगा नदी कोरडी पडली आहे.तुमसर तालुक्यातील माडगी येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नृसिंह - विरसिंह मंदिर परिसरात मोठे डोह आहे. केवळ या डोहात पाणी शिल्लक आहे. येथे वैनगंगेचे तलावात रुपांतर झाल्याचे दिसून येते. मंदिराच्या सभोवताल पाणी आहे. पाण्याचा येवा (धार) बंद झाल्याने पाणी तिथेच थांबले आहे. वैनगंगेचा पुढील प्रवास येथे थांबला आहे. तुमसर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी येथे आहेत. पाण्याचा येवा बंद झाल्याने पुढे पाणीपुरवठा नियमीत होण्याची शक्यता फारच कमी आहे. पाणीपुरवठा योजना नियमित कशा सुरु राहतील याकरिता प्रशासनो येथे नियोजनाची गरज आहे. पाणी वाचवा हा मूलमंत्र केवळ कागदोपत्री नागरिकांना सांगण्यात बरा वाटतो. परंतु शासन व प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना पाणी मुबलक कसे मिळेल याचे नियोजन करण्याची खरी गरज आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कशातरी नागरिकांना पाणीपुरवठा करीत आहेत. तुमसर तालुक् यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एकही पाणीपुरवठा योजना सुरु नाहीत. हस्तांतरणाच्या वादात या योजना मागील ६ ते ८ वर्षापासून रखडल्या आहेत. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. उपकरणे, साहित्य भंगारात जाण्याची वेळ आली. परंतु पाण्याचा एक थेंबही सर्वसामान्य नागरिकांना मिळाला नाही. केवळ येरली पाणीपुरवठा योजना दोन ते अडीच वर्ष लोकसहभागातून चालविण्यात आली. तीही आता बंद पडली आहे. आ.चरण वाघमारे व खा.नाना पटोले यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यापुढे मांडण्याची गरज आहे. अजून किती वर्षापर्यंत या योजना हस्तांतरणाकरिता पांढरा हत्ती ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
वैनगंगा नदीचे झाले तलावात रुपांतर
By admin | Updated: May 20, 2016 00:45 IST