भंडारा : जिल्ह्यात खतांचा काळाबाजार सुरू आहे. साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आलेले आहे. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक सुप्रिया कावळे यांच्या नेतृत्वात रविवारी काही ठिकाणी छापे टाकण्यात आले असता खताचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून आले. आता त्यांच्या कारवाईमुळे साठेबाजी करणाऱ्यांंमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. जिल्हा अधिक्षक कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी उपयोगी खतांचा पुरवठा करण्यात येतो. कृषी विभागाच्या अखत्यारितील कृषी केंद्रांतून हा साठा शेतकऱ्यांपर्यंत पोहचता करण्यात येत असला तरी काही ठिकाणी खतांची साठेबाजी करण्यात आली आहे. हा साठा जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे. शेतकऱ्यांसाठी खतांचा मुबलक साठा असतानाही, काळाबाजारीचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. रविवार शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक सुप्रिया कावळे या भरारी पथकासह नाकाडोंगरी व गोबरवाही येथे विनापरवाना खतांची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकले. येथील किराणा दुकानात व काहींनी परवाना नसतानाही खतांची साठेबाजी करून २९८ रूपयांची खताची एक बॅग ४५० ते ५०० रूपयांना विक्री करीत होते. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरून मध्यप्रदेशची सिमा जवळ असल्याने महाराष्ट्रातील खतांचा साठा तिथे विक्रीला पाठविण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांची ओरड आहे. नागपूर जिल्ह्यातील देवलापार व अन्य ठिकाणाहून खतांचा साठा भंडारा जिल्ह्यात हे साठेबाज आणून विक्री करीत आहे. नागपूर जिल्ह्याला आवश्यक असलेल्या खतांच्या साठ्यात तुट भासणार आहे. त्यामुळे तेथील कृषी अधिकाऱ्यांना या कारवाईत सामावून घेण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
खताची साठेबाजी रोखण्यासाठी महिला गुणनियंत्रकांची धाडसत्र
By admin | Updated: September 22, 2014 23:13 IST